लोकप्रकाश नारायण व नानाजी देशमुख जयंतीनिमित्त योजनेची घोषणा
नवी दिल्ली । वीरभूमी - 11-Oct, 2020, 12:00 AM
लोकनायक जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1.32 लाख लोकांच्या घरांचं ‘स्वामित्व’ पत्र सोपवलं. या योजनेतून महाराष्ट्रातील 100 गावांना याचा लाभ होणार आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता लोकांकडे एक कायदेशीर कागदपत्र आहे, ज्याद्वारे त्यांचं घर आता त्यांचंच राहणार आहे. कोणीही त्यांच्या जमिनीकडे वाईट नजरेने पाहू शकणार नाही. कोणीही त्यांची जमीन त्यांच्या परस्पर हडपू शकणार नाही.
पंतप्रधान मोदींनी यावेळी कृषी कायद्यांना होत असलेल्या विरोधाबाबत भाष्य केले. मोदी म्हणाले की, शेतकर्यांना या कायद्यामुळे अनेक सुविधा मिळत आहेत. ही गोष्ट काही लोकांना खुपत असल्यामुळे ते लोक या कायद्याला विरोध करत आहेत. कृषी कायद्यामुळे त्या नेत्यांची काळी कमाई बंद झाली आहे.
या योजनेतंर्गत देशातील सहा राज्यांमधील 763 गावातील नागरिकांना फायदा होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील 346, हरियाणातील 221, महाराष्ट्रातील 100, उत्तराखंडमधील 55, मध्य प्रदेशातील 44 आणि कर्नाटकातील दोन गावांचा समावेश आहे.
यावेळी मोदी म्हणाले की, आज लोकनायक जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांची जयंती आहे. आजच्या दिवशी हे विराट काम आपण करतोय, याचा मला खूप आनंद होत आहे. आजपासून तुमच्याकडे एक अधिकार आहे, एक कायदेशीर कागदपत्र आहे, ज्यानुसार तुमचं घर केवळ तुमचंच आहे आणि तुमचंच राहील. या योजनेमुळे आपल्या देशातील गावांमध्ये ऐतिहासिक परिवर्तन घडेल. आज ज्या लोकांना त्यांच्या घराचे स्वामित्व पत्र म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड मिळालं आहे, ज्यांनी ते डाऊनलोड केलं आहे, त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो.
Comments