ग्रामसमिती व ग्रामस्थांच्या मागणीनंतर प्रशासक प्रशांत तोरवणे व ग्रामसेवक प्रमोद म्हस्के यांचे आदेश
पाथर्डी । वीरभूमी - 13-Oct, 2020, 12:00 AM
वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गावामध्ये जनता कर्फ्यू लागू करावी, अशी मागणी कोरोना ग्रामसुरक्षा समिती व ग्रामस्थ यांनी केली. यानंतर प्रशासक प्रशांत तोरवणे व ग्रामसेवक प्रमोद म्हस्के यांनी हनुमान टाकळी गावामध्ये बुधवार दि. 14 ते शुक्रवार दि. 16 ऑक्टोबर पर्यंत तीन दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या काळात मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद राहणार असून थुंकणे, घोळक्याने विनाकारण फिरणे व मास्क न वापरणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी गावापासून कोरोना संसर्ग खूप दूर होता. मात्र मागील काही दिवसापासून कोरोनाने गावात एंण्ट्री केली असून दररोज कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कोरोना ग्रामसमिती व ग्रामस्थ यांनी प्रशासक प्रशांत तोरवणे व ग्रामसेवक प्रमोद म्हस्के यांच्याकडे गावात जनता कर्फ्यू लावण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार हनुमान टाकळी गावामध्ये बुधवार दि. 14 ते शुक्रवार दि. 16 ऑक्टोबर 2020 या काळात तीन दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.
याबाबत काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, घराबाहेर जातांना मास्क वापरावा. गावामध्ये 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार नाहीत याची काळजी घ्यावी. गावामधील मेडिकल दुकान वगळता अन्य कोणतेही दुकान व्यवसाय सुरू राहणार नाही. वरील कालावधीत गावामध्ये विना मास्क आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. वरील कालावधीत विनाकारण ग्रामस्थ एकत्र आल्यास पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 100 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
तरी सर्व ग्रामस्थांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. जे आदेशाचे पालन करणार नाही त्यांचेवर साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार कायदेशिर कार्यवाही केली जाईल असा इशारा प्रशासक प्रशांत तोरवणे व ग्रामसेवक प्रमोद म्हस्के यांनी दिला आहे.
BwvhLrKu