मासे पकडण्यासाठी गेलेले दोघे सापडले मृतावस्थेत
जामखेड । वीरभूमी - 14-Oct, 2020, 12:00 AM
तालुक्यातील चौंडी येथील सीना नदीवरील बंधार्यात मासे पकडण्यासाठी गेलेले चुलता-पुतणे वाहुन गेले होते. त्या दोघांचेही मृतदेह बुधवारी सकाळी नदी किनार्यावर तरंगताना आढळून आले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
जामखेड तालुक्यात मागील अठवड्यापासुन जोरदार पाऊस पडत आहे. तालुक्यातील सर्व तलाव, नदी, नाले व बंधारे ओसंडून वाहत आहेत. चौंडी येथील सीना नदीला देखील पूर आला असून येथील के. टी. वेअर बंधारा ओसांडून वाहत आहे. काल दि. 13 रोजी सायंकाळी येथे राहाणारा तुषार गुलाबराव सोनवणे (वय 22) व त्याचे चुलते सतीश बुवाजी सोनवणे (वय 43) व इतर एक असे तिघे जण मासे पकडण्यासाठी या बंधार्यावर गेले होते. चुलता व पुतण्या हे या केटीवेअर बंधार्याच्या खालच्या बाजूला मासे पडत होते. तर त्यांच्या सोबत आलेला एक जण हा बंधार्याच्या काठावर बसला होता. याच दरम्यान पाण्याचा वेग जादा असल्याने यामध्ये चुलता व पुतण्या हे पाण्यात पडून वाहुन गेले. ही घटना बाजुला उभ्या आसलेल्या मुलाने गावात जाऊन सांगितली. यानंतर सदरची घटना लक्षात आली. घटनेची माहिती समजताच तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होत तपासकार्य सुरू केले.
अंधार पडू लागल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. जनरेटरच्या लाईटच्या सहाय्याने देखील या दोघांना शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र प्रयत्नांना यश येत नव्हते. अखेर रात्री उशिरा शोधकार्य थांबवण्यात आले होते. आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू झाली असतानाच बंधार्याच्या जवळ पुतण्या तुषार सोनवणे तर चुलता सतीश बुवाजी सोनवणे यांचे मृतदेह नदीच्या काठालगत तरंगताना आढळून आले. यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
Comments