निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देण्याची तारीख ठरली
अहमदनगर । वीरभूमी - 21-Oct, 2020, 12:00 AM
माहे जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणार्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने सुधारीत प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे निवडणुका स्थगित झालेल्या ग्रामपंचायतींसाठी लवकरच मतदानाची तारीख जाहीर होणार असल्याने गावकीच्या राजकारणाला पुन्हा वेग येणार आहे.
राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता निवडणूक आयोगाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कामकाज म्हणजे प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक दि. 17 मार्च 2020 रोजीच्या आदेशाने ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे आयोगाच्या दि. 17 मार्च 2020 च्या पत्रान्वये आदेशित करण्यात आले होते. या आदेशाने प्रभाग रचना अंतिम करण्याचा टप्पा स्थगित करण्यात आला होता.
आता लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणण्यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्देश जारी करण्यात येत आहेत. यामुळे स्थगित करण्यात आलेला ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या आदेशाने दि. 27 ऑक्टोबर 2020 रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देणे व स्वाक्षरी करणे. सोमवार दि. 02 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देण्यात येणार आहे.
यामुळे कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच निवडणुकांचा दिनांक जाहीर होणार असल्याने प्रशासकांवर पडणारा ताण कमी होवून पुन्हा एकदा ग्रामविकासाला चालना मिळण्यासाठी सरपंच व सदस्यांची निवड होणार आहे. आता ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी गावचे राजकारण तापण्यास प्रारंभ होणार आहे, हे मात्र नक्की.
pMSbhjoDeLIACF