पाथर्डी भाजपाने अडवला पालकमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा
पाथर्डी । वीरभूमी - 22-Oct, 2020, 12:00 AM
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील भालगाव परिसरात पालकमंत्री हसन मुश्रीफ चालले असता त्यांच्या वाहनाचा ताफा भाजपाच्या वतीने अडविण्यात आला. यावेळी पंचनामे न करता शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत भाजपाच्यावतीने निवेदन देण्यात आले.
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ पाथर्डी - शेवगाव दौर्यावर आले होते. पालकमंत्री यांच्या वाहनाचा ताफा पाथर्डी शहरातून भालगावकडे जात असतांना पंचायत समितीसमोर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने अडविण्यात आला.
यामध्ये गोकुळ दौंड, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, काकासाहेब शिंदे, रवी वायकर, सदस्य सुभाष केकाण, सुनील ओहळ, भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, सोमनाथ खेडकर, राजेंद्र दगडखैर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काल बुधवारी आमदार मोनिका राजळे यांनी शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा नुकताच दौरा केला. यामध्ये असे निर्दशनास आले की, अतिवृष्टीने सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. यामुळे पंचनामे न करता शेतकर्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयाची आर्थिक मदत करावी.
निवेदन घेतल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आपल्या वाहनाच्या ताफ्यासह नियोजित दौर्यावर रवाना झाले. यावेळी त्यांच्या सोबत माजी आ. चंद्रशेखर घुले हे होते.
FHYLfrnzSQRVIc