किमान 33 टक्के नुकसान झालेल्या पिकांना मिळणार नुकसान भरपाई
अहमदनगर । वीरभूमी - 09-Nov, 2020, 12:00 AM
जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी राज्यातील विविध जिल्ह्यासाठी 2 हजार 297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. या आदेशात नगर जिल्ह्यासाठी 75 कोटी 26 लाख 81 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचे म्हटले आहे.
राज्यातील विविध भागात जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व फळ पिकांचे नुकासान झाले आहे. या नुकसानीची शासनस्तरावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध मंत्र्यांनी पाहणी केली होती. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही शेवगाव- पाथर्डी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकर्यांच्या भावना जाणून घेतल्या होत्या.
त्यानंतर तातडीने मंत्रीमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत दिवाळी अगोदर नुकसानग्रस्त शेतकर्यांना शेतीपिकांसाठी हेक्टरी 10 हजार रुपये तर फळपिकांसाठी हेक्टरी 25 हजार रुपयाची मदत देण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे शेतकर्यांना मदत देतांना शिक्षक-पदवीधरच्या निवडणुकीचा अडसर निर्माण होतो की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आज राज्य सरकारने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्यांना पहिल्या टप्प्यातील मदत देण्याची घोषणा शासन निर्णय पारित करून जाहीर केली.
राज्यातील विविध जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांची नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी 2 हजार 297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचा आदेश काढण्यात आला. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यासाठी 75 कोटी 26 लाख 81 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र ही मदत देतांना सरसकट ऐवजी 33 टक्के नुकसानग्रस्त पिकांना मिळणार आहे.
Comments