गावात हरिनाम सप्ताह केला अन् 23 जणांना झाली कोरोनाची लागण
जामखेड । वीरभूमी - 10-Nov, 2020, 12:00 AM
सोनेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या जेवणावळीत कोरोना बाधीताने वाढपीचे काम करत सर्वत्र फिरला. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या 139 च्या आसपास नागरिकांनी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली. त्यामध्ये 23 जण कोरोना बाधीत निघाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या सप्ताहात आसपासच्या गावातील नागरिकांनी हजेरी लावली. त्यामुळे रूग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमावर बंधन असताना अयोजकांनी कोणाच्या परवानगीने सप्ताह अयोजीत केला? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यातील सोनेगाव येथे काही उत्साही कार्यकर्त्यांनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताहात काही संशयीत कोरोना बाधीतांनी सहभाग घेतला होता. त्यातील चार जण तीन दिवसापूर्वी बाधीत निघाले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनी सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याचे किर्तनाला उपस्थिती लावली होती.
या किर्तनात सोनेगाव येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. तसेच आसपासच्या धनेगाव, वंजारवाडी, तरडगाव येथील नागरीक आले होते. संक्रमित कोरोना बाधीताने महाप्रसादात वाढपीचे काम केले. तसेच इतरत्र फिरले होते. एकीकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नका, असे सांगतात पण नागरीक दखल घेत नाहीत.
वाढपीचे काम करणारा हा कोरोना बाधीत निघाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या 139 च्या आसपास नागरिकांनी सोमवारी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली. त्यामध्ये 23 जण बाधीत आढळले. कोरोना बाधितांचा आकडा वाढू शकतो तसेच अनेकजण रॅपिड अँटिजेन टेस्ट मध्ये निगेटिव्ह येतात. पण आर.टी.पि.सी.आर. चाचणीत पॉझिटिव्ह येतात. त्यामुळे सर्वांची आर.टी.पि.सी.आर. चाचणी बंधनकारक करणे गरजेचे आहे. परंतु नागरीक ते करीत नाहीत. प्रशासनाने यात लक्ष घालण्याची गरज आहे.
Comments