प्रभागातील कुटुंबांना किराणा साहित्य भेट देत दिवाळी केली गोड
कर्जत । वीरभूमी - 12-Nov, 2020, 12:00 AM
कोरोना महामारी आणि वाढती महागाईच्या काळात गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी कर्जत शहरातील घुले बंधूनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले आणि कर्जत जामखेड युवकचे अध्यक्ष तथा नगरसेवक सचिन घुले यांनी प्रभागातील कुटुंबांना मोफत दिवाळी किराणा साहित्य घरपोहच करण्याचा निर्णय घेत प्रत्यक्ष किराणा साहित्य पोहोच केले.
कोरोना महामारीमुळे पुकारण्यात आलेला लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. या काळात अनेकांचा रोजगार बुडाल्याने प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडले गेले. नुकतीच बाजारपेठ खुली झाली. मात्र बिघडलेले आर्थिक गणित जुळविण्यात येत नसल्याने दिवाळी सारख्या मोठ्या सणात देखील बाजारपेठ ओस पडल्या आहेत.
यासह अनेक वस्तूचे भाव गगनाला भिडले असल्याने गोरगरीब कुटुंबाची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती ओढावली आहे. याच गोष्टीची सामाजिक जाणीव ठेवत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले आणि कर्जत-जामखेड युवकचे अध्यक्ष तथा नगरसेवक सचिन घुले या दोघा बंधूनी आपल्या प्रभागातील कुटूंबियांची दिवाळी गोड करण्याचा संकल्प हाती घेतला. मंगळवारी घुले बंधूंनी दिवाळी सणासाठी लागणारा किराणा साहित्य यासह सुगंधी उटणे, साबण घरपोहच केले. घुले बंधूंच्या या उपक्रमाचे आणि सामाजिक जाणिवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Comments