केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास : आ. आशुतोष काळे
कोपरगाव । वीरभूमी - 13-Nov, 2020, 12:00 AM
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना (पी.एम.किसान) योजनेंतर्गत मागील वर्षापासून प्रत्येकी २ हजार रुपये मदत दिली जात होती. मात्र केंद्र शासनाने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यातून ऐन दिवाळीच्यावेळी हि रक्कम परस्पर काढून घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांचे कोरोना संकटामुळे कंबंरडे मोडले असतांना राज्य शासन त्यांना वेळोवेळी मदत करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळत आहे.
मागील वर्षी देखील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. यावर्षी देखील अतिवृष्टीमुळे झाल्यामुळे शेतकरी अडचणीत असल्यामुळे कोरोना संकटात देखील राज्य शासन मदत करीत आहे तर दुसरीकडे पी.एम.किसान योजनेची रक्कम केंद्र शासनाने परस्पर काढून घेतल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे.
या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मदत करतांना सर्व कागदपत्रांची पडताळणी करूनच शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. हि मदत मिळविण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भार सोसावा लागला आहे. आर्थिक भार सोसून देखील आलेली मदतीची रक्कम केंद्र शासनाने परत घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याची केंद्र शासनाची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्याकडे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वतीने आपण गाऱ्हाणे मांडणार आहे. शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत सोसाव्या लागणाऱ्या अडचणीबाबत शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव असलेले जाणते राजा शरदचंद्रजी पवार साहेब यातून नक्कीच मार्ग काढतील, असा आशावाद आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.
Comments