पाथर्डीत विना मास्क फिरणार्या 119 जणांना दंड
पाथर्डी । वीरभूमी - 21-Nov, 2020, 12:00 AM
महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन या सर्वांनी मिळून कोरोनाची दुसरी लाट भयंकर स्वरूप धारण करू नये यासाठी संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. तहसीलदार श्याम वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, पदाधिकारी यांनी रस्त्यावर उतरून जनजागृती करत आहेत. आज शनिवारी 119 जणांवर दंडात्मक कारवाई करत सुमारे 11 हजार 900 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई तहसीलदार वाडकर, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. भगवान दराडे आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शनिवारी सकाळी तहसील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत कोरोना रोखण्यासाठी उपाय योजनाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी संयुक्त मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेत आज मास्क न वापरणार्यांवर दंडात्मक कारवाई केली.
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या इशार्यानंतर कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तशा सुचनाही वरीष्ठ पातळीवरून स्थानिक प्रशासनास दिल्या गेल्या आहेत. या मोहीमेचा एक भाग म्हणून आज विना मास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच प्रारंभ झाला. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये विना मास्क व्यक्तींकडून तात्काळ जागेवर दंड करून मास्क वापरण्याच्या सुचना प्रशासनाकडून दिल्या गेल्या. या दंडात्मक कारवाईच्या धास्तीने व भितीने नागरिकांमध्ये जागृती होताना दिसत आहे. यामुळे अचानक मास्कची मागणी व विक्री वाढली आहे.
आज शनिवारी पाथर्डी शहरातील विविध भागात व चौकात करण्यात आलेल्या कारवाईत विना मास्क फिरणार्या 119 जणांवर दंडात्मक कारवाई करून 11 हजार 900 रूपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाई मोहीमेत नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर जावळे, नगरपालिका कार्यालयीन प्रशासकीय अधिकारी अय्यूब सय्यद, पोलीस कर्मचारी भगवान सानप, राहुल खेडकर, संदीप नागरगोजे, देविदास तांदळे, अतुल शेळके, जयदत्त बांगर, होमगार्ड जवान आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
Comments