बिबट्याच्या भितीमुळे शेती पंपाचा वीजपुरवठा दिवसा करावा ः स्वप्नील खाडे यांची मागणी
अहमदनगर । वीरभूमी - 26-Nov, 2020, 12:00 AM
ग्रामीण भागातील, शेतातील शेतीपंपासाठी लागणारी विद्युत लाईट रात्री सोडली जाते. शेतकर्यांना आपला जीव मुठीत धरून कुठलीही सुरक्षितता नसताना विंचू - काट्याची, सर्पाची कसलीही परवा न करता त्याचे पीक जाऊ नये, म्हणून जीवाचे रान करावे लागते. रात्रीचा वीजपुरवठा न करता दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी स्वप्नील खाडे यांनी ऊर्जामंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जीव गमावत आहेत व त्यासाठी प्रशासनाने व विद्युत महामंडळाने वीजपुरवठा शेतीसाठी दिवसा सोडण्यात यावा अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ता स्वप्नील खाडे, विकी सदाफुले, नासीर सय्यद, अमित गंभीर आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, तालुका जिल्हा व राज्य, स्थानिक शासन संस्था व प्रादेशिक निवडणुकात फक्त माझ्या बळीराजाचे कष्टाचे भांडवल केले जाते. पण या विषयी ठोस निर्णय कोणीही घेत नाही. जामखेड, आष्टी, पाटोदा तालुका परिसरात बिबट्याची दहशत आहे. याबद्दल स्थानिक शासन संस्था आम्हाला, दिवसभरात काय नाही करायला पाहिजे याच्या सूचना देते. पण आमच्या शेतकर्यांची जीवन व उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे.
रात्रीच्या वेळेस लाईट असल्यामुळे शेतीला पाणी द्यायला शेतात जावे लागत आहे. शेतकरी हा रात्रंदिवस राबत राहतो. पण काही महिन्यांपासून परिसरांमध्ये शेतकर्यांना बिबट्याचा वावर दिसून येत आहे. वनविभाग त्यासाठी फक्त प्रयत्नशील आहे. परंतु त्याचा बंदोबस्त अजून झालेला नाही. आमच्या परिसरांमध्ये ना कुठली एमआयडीसी औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे वीजेवर लोड येण्याचा प्रश्न येत नाही तर जोपर्यंत शेतकर्यांचे ज्वारी भरणा (भिजवणे)आहे तोपर्यंत तरी दिवसाचा वीजपुरवठा करावा, अशी विनंती केली आहे. दिवसाचा वीजपुरवठा न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Comments