शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन
पारनेर । वीरभूमी - 26-Nov, 2020, 12:00 AM
शासकिय कर्मचारी व शिक्षक यांच्याबाबत आर्थिक सेवाविषयक व इतर समस्या व मागण्या विषयी सध्याचे केंद्र व राज्य शासनाचे धोरण नकारात्मक व कर्मचारी विरोधी असल्याने पारनेर तालुका शिक्षक संघटनेने शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून विविध मागण्या विषयीचे निवेदन पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना दिले.
पारनेर तालुका शिक्षक संघटनेने यावेळी शासनाच्या धोरणाचा निषेध करीत कर्मचार्यांची मोठी उपेक्षा होत असल्याने आजच्या लाक्षणिक संपात सहभाग घेतला. विविध मागण्या विषयीच्या निवेदनात अंशदायी पेन्शन योजना रद्द करणे, विनाअनुदानित शाळांना व तुकड्यांना तातडीने अनुदान अदा करणे, सातव्या वेतन आयोगानुसार राज्य शासकीय कर्मचार्यांप्रमाणे 10 ,20, 30 वर्षांची आश्वासित प्रगती योजना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना लागू करणे. केंद्रीय कर्मचार्यांप्रमाणे सर्व भत्ते लागू करणे. शिक्षकांना विनाअट निवड व वरिष्ठ श्रेणी लागू करणे इत्यादी मागण्यांचा त्यात समावेश आहे.
याप्रसंगी पारनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब निवडूंगे, उपाध्यक्ष सुरेश थोरात, सचिव भगवान राऊत, सहसचिव बाबासाहेब दौंड, खजिनदार जयवंत पुजारी तसेच संघटनेचे पदाधिकारी संदीप शिंदे, विजय पठारे, रमेश गायकवाड, बाबाजी शिंदे, राजू शिंदे, भास्कर काकडे, रवींद्र मते, शिवाजीराव गुंजाळ, दादासाहेब ठवाळ व संघटनेचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments