रविवारी सायंकाळी बिबट्याचा पुन्हा हल्ला; एक महिला ठार
आष्टी । वीरभूमी - 29-Nov, 2020, 12:00 AM
आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथे सकाळी एका महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास बिबट्याने एका महिलेचा बळी घेतला आहे.
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे नरभक्षक बिबट्याचा आष्टी तालुक्यातील हा तिसरा बळी ठरला आहे. सुरेखा नीळकंठ बळे (वय 45) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. सकाळी महिलेवर जीवघेणा हल्ला व सायंकाळी गेलेला बळी यामुळे आष्टी तालुका सुन्न झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सुरेखा बळे या पारगाव जोगेश्वरी येथील शेतवस्तीवर कुटुंबासह राहतात. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्या घराच्या पाठीमागे शौचासाठी गेल्या होत्या. यावेळी बिबट्याने त्यांना मानेला धरून उचलून नेत ज्वारीच्या शेतात नेले. बराच वेळ होऊनही त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता ज्वारीच्या शेतात छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
या घटनेने खळबळ उडाली आहे. सकाळी शालनबाई शहादेव भोसले (वय 60, रा. बोराडेवस्ती, पारगाव जोगेश्वरी) या महिलेवर साडेअकराच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यात मानेला गंभीर जखमा झाल्याने त्यांना नगरला हलविण्यात आलेले आहे.
Comments