जेरबंद झालेल्या बिबट्यांची संख्या चार वर
पाथर्डी, करंजी । वीरभूमी - 03-Dec, 2020, 12:00 AM
अनेक दिवसापासून पाथर्डी-आष्टी तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्यावतीने ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. या पिंजर्यात आज गुरुवारी मढी-शिरापूर रोडवरील शेरी परिसरात लावण्यात आलेल्या पिंजर्यात एक नर जातीचा बिबट्या अडकल्याचे निदर्शनास आले. यामुळे पिंजर्यात जेरबंद झालेल्या बिबट्यांची संख्या चार झाली आहे. नरभक्षक बिबट्या हाच आहे का? यासाठी त्याला तपासणीसाठी नगर व बोरिवली येथे घेवून जाण्यात येणार आहे.
मागील काही दिवसापासून पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगर रांगा परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत मढी, केळवंडी व शिरापूर येथील तीन बालकांचा बळी घेतला आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्यावतीने ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. या अगोदर लावण्यात आलेल्या पिंजर्यात तीन मादी बिबट्या जेरबंद झाले आहेत. मात्र नर बिबट्या मोकाट असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण कायम होते.
मात्र आज गुरुवारी मढी - शिरापूर रोडवरील शेरी परिसरात लावण्यात आलेल्या पिंजर्यात बिबट्या अडकल्याचे आढळून आले. जेरबंद झालेला बिबट्या हा 5 ते 6 वर्षाचा असून नर जातीचा आहे. पिंजर्यात अडकलेल्या बिबट्यामध्ये हा बिबट्या सर्वात मोठा आहे. यामुळे नरभक्षक बिबट्या हाच असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र वनविभागाच्यावतीने हा बिबट्या तपासणीसाठी नगर व बोरिवली येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचार्यांनी दिली.
बिबट्या जेरबंद झाला असला तरी या भागात आणखी बिबट्या आहे की नाही, याचा शोध घेतला जात आहे. तरी नागरिकांनी बेफिकिरपणे न वागता काळजी घेवून व सर्व खबरदारी घेवून राहावे, असे आवाहन वनभिगाने केले आहे.
thNYyoJpWMXqD