भाळवणी येथे घडला अपघात
भाळवणी । वीरभूमी - 05-Dec, 2020, 12:00 AM
कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे गोरेगाव चौकात तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
याविषयी अधिक माहिती अशी की, खडी वाहतुक करणारा हायवा डंपर, ऊसाने भरलेला ट्रॅक्टर व पिकअप टेम्पो या तीन वाहनांचा अपघात शुक्रवारी रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास येथील गोरेगाव फाट्याजवळ घडला असून त्यात ट्रॅक्टरमधील एक जण जागीच ठार तर एक जण जबर जखमी झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
शुक्रवारी रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास बेल्हा पाडळी येथील शेतकरी ऊसाने भरलेला ट्रॅक्टर भाळवणीच्या दिशेने घेऊन येत असताना खडीने भरलेला डंपर (एम.एच. 20 डीई 4726) पाठीमागून भाळवणीकडेच येत होता. तर पिकअप टेम्पो (एम.एच. 05, ईएल 0357) कल्याणच्या दिशेने जात होता. ट्रॅक्टर पुढे चाललेला असताना समोरुन पिकअप टेम्पो येत होता. त्याचवेळी ट्रॅक्टरच्या पाठीमागून खडीने भरलेला डंपर भरधाव वेगात येत होता.
यावेळी डंपर समोर चाललेला ऊसाचा ट्रॅक्टर चालकाच्या लक्षात न आल्याने जोराची धडक होऊन ट्रॅक्टरचे ट्रॉलीसह चार तुकडे होऊन साइडच्या गटारात जाऊन पडले तर डंपर विरुद्ध दिशेने रोडच्या बाजूला पलटी झाला. तर या वाहनांच्या मध्ये पिकअप टेम्पो आल्याने पिकअपची चालकाच्या पाठीमागील बाजू पुर्णपणे चिरली गेली. यावेळी घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता. जखमींना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. पुढील तपास पारनेर पोलिस करीत आहेत.
Comments