पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथील घटना
पाथर्डी । वीरभूमी - 09-Dec, 2020, 12:00 AM
पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागातील मिडसांगवी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 16 वर्षीय तरूणी जखमी झाली असून तिच्यावर खरवंडी कासार येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेने तालुक्याच्या पूर्व भागात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, आज बुधवार दि. 9 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास तालुक्यातील मिडसांगवी येथील सानिया दिलावर शेख (वय 16 वर्षे) या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. सानियाच्या गळ्याला स्कार्प बांधलेला असल्यामुळे ती बचावली. मात्र बिबट्याने तिच्या हातावर पंजा मारल्याने ती जखमी झाली आहे. तिला खरवंडी कासार येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अगोदर मिडसांगवी येथे बिबट्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
या अगोदर तालुक्यातील अनेक भागात बिबट्याने दर्शन दिले असून मढी, केळवंडी, शिरापूर येथील तीन बालकांचा बिबट्याने जीव घेतला आहे. वनविभागाच्यावतीने ज्या - ज्या भागात बिबट्या दिसला त्या भागात पिंजरे लावले आहेत. मात्र यातील अनेक पिंजर्यामध्ये कोणतेही सावज ठेवले जात नाही. यामुळे वनविभागाकडून पिंजरा लावण्याचा दिखावा केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.
CmkYqSuJLh