राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर । आजपासून आचारसंहिता लागू
मुंबई । वीरभूमी - 11-Dec, 2020, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतीसह राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार असून 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित अहमदनगर जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतीसह राज्यातील सुमारे एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीन राबविण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगानं जाहीर केले आहे.
या कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार 1 डिसेंबर 2020 रोजी सुमारे 14234 ग्रामपंचायतींसाठी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून, 7 डिसेंबर 2020पर्यंत त्यावर हरकती घेण्यात आल्या आहेत. 9 डिसेंबरच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदारयादी 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.
सदर निवडणुका पार पाडताना कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाच्या खबरदारीबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. त्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही निवडणूक आयोगानं केलं आहे.
gJXGqRBLx