प्रांताधिकाऱ्यांसमोरील दाव्याच्या निकाल आदेशाची प्रत देण्यासाठी लाच स्वीकारतांना लघुलेखक चतुर्भूज
श्रीगोंदा । वीरभूमी - 17-Dec, 2020, 12:00 AM
श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील चुकीचा फेरफार रद्द करण्याचा दाव्याच्या आदेशाची निकाल प्रत देण्यासाठी श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय कार्यालयातील लघुलेखक महिला कर्मचाऱ्यांने १० हजार रुपयांची मागणी केली होती.
त्यातील ४ हजार रुपये दि. १६ रोजी नगर येथे घेऊन निकाल आदेशाची प्रत दिल्यावर बाकीची रक्कम देण्याचे कबूल केले होते. मात्र तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. व त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात विभागीय कार्यालयातील लघुलेखक म्हणून काम करणाऱ्या शैला राजेंद्र झांबरे यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील तक्रारदार यांचे जमिनीचे संदर्भात उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा- पारनेर यांचे समक्ष "चुकीचा फेरफार रद्द करणेबाबत" सुरु असलेल्या दाव्याचे निकालपत्राची आदेशाची प्रत देण्याकरिता आरोपी लोकसेविका श्रीमती शैला राजेंद्र झांबरे, लघुलेखक, वर्ग 3 , उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा-पारनेर कार्यालय यांनी तक्रारदार यांच्याकडे दि. १६ डिसेंबर रोजी १० हजार रुपयांची मागणी केली व त्याचवेळी ४ हजार रुपये स्विकारुन उर्वरित रक्कम घेऊन आल्यावर आदेशाची प्रत देईल असे सांगितले.
तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांच्याकडे तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून विभागाने गुरुवार दि.१७ रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयात सापळा रचून मागणी केलेल्या ५ हजार रुपयांवरून अखेर तडजोडीत ३ हजार रुपयांची लाच घेताना आरोपी लोकसेविका शैला झाम्बरे यांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. या कारवाईचे हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफही घेण्यात आले आहेत.
या कारवाईत सापळा अधिकारी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक शाम पवरे व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.
या कारवाईसाठी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक व पर्यवेक्षण अधिकारी म्हणून हरीष खेडकर यांनी काम पाहिले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधकनाशिक परिक्षेत्र विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे, वाचक पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
HtDdYPAKawEmsgrp