श्रीगोंद्यात ढवळगाव बिनविरोध; 59 ग्रामपंचायतीसाठी 1096 उमेदवार रिंगणात
श्रीगोंदा । विजय उंडे - 05-Jan, 2021, 12:00 AM
श्रीगोंदा तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींची ग्रामधुमाळी सुरू झाली. काल उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी 953 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. यामुळे 59 ग्रामपंचायतीसाठी 1096 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर तालुक्यात ढवळगाव ग्रामपंचायतीसह 71 उमेदवारांनी बिनविरोधचा मान मिळवला आहे.
तालुक्यातील 59 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तब्बल 2166 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. यामध्ये ऑनलाईन 1620 तर ऑफलाईन 526 उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. या दाखल अर्जाची छाननी होऊन 46 अर्ज अवैध ठरले तर 2120 वैध अर्ज ठरले. सोमवार दि. 4 रोजी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवसा अखेर तब्बल 953 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात 1096 उमेदवार राहीले आहेत.
तालुक्यात एकमेव ढवळगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. तर इतर ग्रामपंचायतीच्या 71 जागा बिनविरोध झाल्या आहे. यामुळे 1096 उमेदवारांमध्ये निवडणूक होत आहे. ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत असून 18 रोजी मतमोजणी होणार आहे.
अर्ज माघारी दिवशी गावोगावचे उमेदवार व समर्थक मोठ्या प्रमाणावर आल्याने श्रीगोंदा येथील नगरपालिकेच्या सांस्कृतिक सभागृहाला जत्रेचे स्वरूप आले होते. निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार परत एकदा समोर आला. प्रत्येक गावासाठी एक टेबल होते. परंतु त्या टेबलापुढे अभूतपूर्व गर्दीचे कोंडाळे दिसून आले. अर्ज माघारी व चिन्हांचे वाटप अतिशय संथगतीने चालू होते. सोमवारी रात्री उशिरापर्यंत निवडणूक विभागाचा घोळ चालू होता. प्रशासनाने कोरोना काळ असूनही सामाजिक अंतर राखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. गावोगावच्या समर्थकांचे जथ्थे चार चाकी गाड्यांमधून आल्याने पार्किंगचा बोजवारा उडाला होता.शनी चौकात दिवसभर ट्रॅफिक जाम होते. दिवसभर आकाश भरून आले व रिमझिम पावसाने गर्दीची तारांबळ उडाली होती.
अर्ज माघार घेण्यासाठी नेत्यांची काही उमेदवारांनी चांगलीच गंमत केली. रुसवे फुगवे, मनधरणी, दमदाटी, एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान सगळे प्रकार पाहायला मिळाले. आमदार बबनराव पाचपुते यांनी बिनविरोध निवड होणार्या ग्रामपंचायतीला 10 लाखांचा निधी जाहीर करूनही फक्त एकमेव ढवळगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तर 71 जागेंवर प्रतिस्पर्ध्यानी अर्ज माघारी घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. दि. 15 रोजी मतदानापर्यंत साम-दाम-दंड-भेद सगळे प्रकार अनुभवायला मिळणार आहेत.
zVXeKIvGjou