शेवगाव । वीरभूमी - 04-Feb, 2021, 12:00 AM
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शेवगाव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून पक्षाच्या वतीने लवकरच शहर विकासाचा जाहिरनामा व उमेदवारांची यादी जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे व राज्य कौन्सिल सदस्य संजय नांगरे यांनी दिली.
शेवगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ज्येष्ठ नेते कृष्णनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली भाकप कार्यकर्त्यांची बैठक गुरूवारी ( दि. ४ ) शेवगाव येथे पार पडली.
या वेळी ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत कुलकर्णी, भगवान गायकवाड, बबनराव पवार, वैभव शिंदे, बापूराव लांडे आदींनी बैठकीत आपले विचार मांडले. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीची माहिती देताना अॅड. लांडे म्हणाले, शेवगाव शहर हे कापूस व धान्यांचे प्रमुख केंद्र असून मराठवाड्याच्या सरहद्दीवरील महत्वाचे वाहतुकीचे शहर मानले जाते. जायकवाडी धरणाचे पाणी जवळ असल्याने शहराची वसाहत वाढत आहे. कापूस उद्योगावर आधारित १२ ते १३ जिनिंग व इतर उद्योग शहरात आहेत.
परंतु, शेवगाव नगर परिषदेत अडिच - अडिच वर्षे अशी सत्ता भोगणा-या राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपच्या पदाधिका-यांनी शहर विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने नागरी समस्या व विकासाचा मोठा अनुशेष शिल्लक राहिला आहे. राज्यात भाजपची काही काळ तर सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्ता असताना व तेथे शब्दाला वजन असताना शहरविकासासाठी मोठा निधी मिळू शकला नाही.
शहरापासून अवघ्या १० किलोमीटरवर जायकवाडी धरण असताना नागरिकांना १० ते १२ दिवसांनी पिण्याचे पाणी मिळते. अनेक संघटनांनी व भाकपने महिलांसह पाण्यासाठी अनेक मोर्चे, आंदोलने काढण्यात आली. परंतु सत्ताधा-यांच्या दुर्लक्षामुळे धरण उशाला अन् कोरड घशाला अशी शेवगावकरांची अवस्था झाली आहे.
कोट्यावधींचा निधी मिळूनही सत्ताधा-यांनी त्यांनी शहरांतर्गत रस्ते, नाले, सफाईचे अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. शहर विकासापेक्षा वैयक्तिक विकासात नगरसेवकांनी लक्ष दिले. दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांना शहरविकासाचे काही देणे घेणे नाही. राजकिय व सामाजिक दृष्टिकोन तसेच शहर विकासाचे गांभिर्य दोन्ही पक्षाच्या नेत्यांना , पदाधिकारी-यांना नसल्याने फक्त सत्तेचे पद भोगण्यातच त्यांनी धन्यता मानली.
भाकपने शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून ते प्रश्न धसास लावले आहेत. या आधी शेवगाव ग्रामपंचायत असताना भाकपने बहुमत मिळवत सत्ता मिळवली होती. सरपंच व उपसरपंच पदे मिळवत शहर विकासाचे काम केले होते.
चारित्र्यसंपन्न, निष्ठावंत, निष्कलंक व निस्वार्थी अशा कार्यकर्त्यांचा संच भाकपकडे असून निवडणूकीत जास्त पैसे खर्च करण्याची क्षमता हा निकष न ठेवता पक्षातर्फे निष्ठावंत, निष्कलंक व निस्वार्थी कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. पक्ष सभासदा व्यक्तीरिक्त चारित्र्यसंपन्न, निष्ठावंत, निष्कलंक व निस्वार्थी कार्यकर्त्यांनी भाकपतर्फे उमेदवारीची मागणी केली तरीही आम्ही त्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊ.
नगर परिषेदत भाकपच्या ताब्यात सत्ता आली तर शहरविकासाचे प्रश्न मार्गी लावून जनतेला दिलासा मिळेल. असे अॅड. लांडे म्हणाले.
Comments