कोरोना लाट रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या उपाययोजना । जिल्ह्यात रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी
अहमदनगर । वीरभूमी- 22-Feb, 2021, 12:00 AM
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील काही प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून अहमदनगर जिल्ह्यात दि. 15 मार्च 2021 पर्यंत रात्री 10 ते सकाळी 5 या वेळेत (अत्यावश्यक सेवा वगळता) संचार बंदी लागू केलेली आहे.
तसेच सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आज सोमवारी जारी केले.
रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधून खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. याबाबतचे आदेश सोमवारी काढले.
या आदेशात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीमध्ये दि. 23 फेब्रुवारी 2021 च्या मध्यरात्री पासून दि. 15 मार्च 2021 पर्यंत रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी राहणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. कन्टेन्मेंट झोनसाठीचे मागी आदेश कायम ठेवण्यात आले आहे. लग्न समारंभाला आलेले वर्हाडी, पाहुणे मंडळी, मंगल कार्यालयाचे कर्मचारी, आचारी व इतर उपस्थित सर्व व्यक्ती मिळून जास्तीत जास्त 50 व्यक्तींनाच उपस्थित राहाता येईल. या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने 100 टक्के मास्कचा वापर, वेळोवेळी हाताची स्वच्छता व सुरक्षित अंतर याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे.
अंत्यसंस्कारासाठी जास्त जास्त 20 व्यक्तींना एकत्र येण्यास निर्बंध असणार नाहीत. जिल्ह्यातील हॉटेल्स, फुड कोर्टस्, रेस्टॉरंटस, बार तत्सम अनुज्ञाप्ती यांना 50 टक्के क्षमतेने शारिरीक अंतर ठेवून व स्वच्छतेच्या उपाययोजनांसह सुरू ठेवण्यास निर्बंध असणार नाहीत. शाळा, महाविद्यालयात कर्मचारी व विद्यार्थी यांनी मास्कचा व सॅनिटायझरचा वापर तसेच शारिरीक अंतराचे निकष ठेवून नो मास्क, नो एंट्री या तत्वावर अवलंब करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर राहील.
महाविद्यालयाचे व्यवस्थापन व शाळांचे संस्थाचालक शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करतात की नाही याची पोलीस विभाग व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संयुक्तपणे अचाकन महाविद्यालय व शाळांना भेटी देवून तपासणी करावी कोणी अंमलबजावणी करत नसल्यास कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
BnGQTqbhUvwMxIW