अंबरनाथ येथून चोरीला गेलेली बस शेवगावात सापडली
शेवगाव । वीरभूमी - 24-Feb, 2021, 12:00 AM
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथून चोरीला गेलेली पिवळ्या रंगाची स्कूल बस (क्र. एमएच 03, 2709) शेवगाव उपविभागिय पोलिस अधिक्षक सुदर्शन मुंढे यांच्या पथकाने शेवगाव येथे पकडली. पोलिसांचा सुगावा लागताच चोरटे बस सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले.
अंबरनाथ येथून पिवळ्या रंगाची स्कूलबस (क्र. एमएच 03, 2709)चोरीला गेल्याच्या फिर्यादीवरून अंबरनाथ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासात ही बस अहमदनगरच्या दिशेने गेल्याचे समोर आले.
यावरून अंबरनाथ पोलिस ठाण्याचे पो.नि. कोचरे यांनी अहमदनगर जिल्हा पोलिसांना कळविले होते. यावरून जिल्हा पोलिसांनी वायरलेस वरून जिल्ह्यातील सर्व उपविभागिय कार्यालये व तालुका व शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली होती.
त्याचदरम्यान गुप्त खबर्या मार्फत चोरीची बस नेवासा रोडवर पाहिल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिक्षक सुदर्शन मुंढे व सपोनि. सोपान गोरे यांना समजताच तपासासाठी तात्काळ चक्रे फिरुन दोन तासात चोरीला गेलेली बस नेवासा रोडवरील त्रिमुर्ती कॉलेज जवळ उभी असल्याचे निष्पन्न झाले.
बसची माहिती कळताच सपोनि. सोपान गोरे यांनी कैलास पवार, वसंत फुलमाळी, संदीप बर्डे, विकी पाथरे, नारायण बडे व उपविभागीय पोलीस पथक सोबत घेऊन कारवाई केली असता पोलिसांचा सुगावा लागताच बस जागेवरच सोडून चोरटे पसार झाले.
स्कूल बस सापडल्याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय व अंबरनाथ पोलिस ठाणे यांना कळविण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे कौतूक होत आहे.
Comments