आरोपीलाही केली अटक
खर्डा । वीरभूमी - 26-Feb, 2021, 12:00 AM
जामखेड तालुक्यातील जातेगाव येथील काळे वस्तीवर वासुदेव महादेव काळे यांनी लावलेली अफूची झाडे जामखेड पोलिसांनी जप्त केली आहेत. जामखेड पोलिसांनी सदरील ठिकाणी छापा टाकून तब्बल 1 लाख 70 हजार रुपये किंमतीची 56 किलो आफुची झाडे जप्त करून आरोपीस अटक केली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त खबरीकडून माहीती मिळाली की, जातेगाव येथील काळेवस्तीवर अफुची झाडे आहेत.
या माहितीची खातरजमा केल्यानंतर सदरील ठिकाणी छापा टाकला असता आरोपी वासुदेव महादेव काळे (रा. काळे वस्ती, जातेगाव) याने त्याच्या मालकीच्या गट नंबर 1077 मधील शेतात अफूची झाडे आढळून आली.
पोलिसांनी ही झाडे जप्त केली असून याचे वजन यब्बल 56 किलो आहे. तर याची किंमत तब्बल 1 लाख 69 हजार 815 रुपये एवढी आहे. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपी वासुदेव काळे याला अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह पो. हे. कॉ. संजय लाटे, संदीप आजबे, संग्राम जाधव, आबासाहेब अवारे, विजय कोळी, सचिन पिरगळ, संदीप राऊत, अविनाश ढेरे यांच्या पथकाने गुरुवारी (दि.25) सायंकाळी करून रात्रीच गुन्हा दाखल केला.
याबाबत जामखेड पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ. संजय लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी वासुदेव महादेव काळे याच्या विरोधात अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी (उत्तेजक) पदार्थ अधिनियम सन 1985 च्या कलम 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे करत आहेत.
Comments