शिक्षक बँक शताब्दी भेटीला फुटले पाय
सदिच्छा मंडळाचा आरोप; संचालक आणि नेत्यांनी लाटले 146 घड्याळे
अहमदनगर । वीरभूमी - 07-Mar, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक म्हणजे शिक्षकांच्या गरजा पूर्ण करणारी कामधेनूच!या कामधेनूच्या माध्यमातून अनेक शिक्षक बांधवांचे प्रपंच उभे राहिले. पण गेल्या काही दिवसांपासून या बँकेमागे लागलेले शुक्लकाष्ठ काही केल्या संपायला तयार नाही. घड्याळ खरेदी, कर्मचारी फरक लाटणे यामुळे बँकेची पत खालावली असतानाच शताब्दी भेट म्हणून सभासदांसाठी खरेदी केलेली तब्बल 146 घड्याळे संचालकांनी आपल्या घरी नेत "वाहत्या गंगेत हात धुतल्याचा " प्रकार समोर आला आहे. घड्याळ चौकशी साठी नेमलेल्या समितीसमोर खुद्द बँकेच्या मुख्याधिकाऱ्यांनीच हि माहिती दिल्याचा गौफ्यस्फोट सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष नारायण राऊत यांनी केला आहे.ताटातील घास हिरावल्याने नेहमी सत्ताधाऱ्यांवर टीका करणारी रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मात्र आपल्या गटाचे संचालकही यात गुंतल्याने मिठाची गुळणी धरून बसली आहे हे विशेष!याबाबत सविस्तर माहिती अशी,प्राथमिक शिक्षक बँकेला शताब्दी पूर्ण झाल्यनिमित्त सभासदांना भेट म्हणून घड्याळ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.पण प्रत्येक गोष्टीत स्वतःचा फायदा पाहणाऱ्या संचालक मंडळाने यात फायदा पहिला नसता तर नवलच! निविदा मागवण्यापासूनच हि खरेदी संशयाच्या भोवऱ्यात अडकली. सदिच्छा मंडळाचे पारनेर तालुकाध्यक्ष संतोष खामकर यांनी या प्रकाराला वाचा फोडली आणि संपूर्ण प्रकरण समोर आणत थेट चौकशी समितीच नेमण्यास भाग पाडले.
या चौकशीत या खरेदीतील अनेक कृष्णकृत्य समोर येत आहेत. तब्बल 72 लाखांचा एवढा मोठा व्यवहार असून देखील या खरेदीसाठी जिल्हा उपनिबंधकांची परवानगी घेतली गेली नाही, ऑनलाइन नसलेल्या स्थानिक पेपरला जाहिरात देऊन थेट गुजरातवरून निविदा मागवणे, बाजारात अगदी अडीचशे तीनशे रुपयांना मिळणारं घड्याळ थेट सहाशे रुपयांना खरेदी करणे, घड्याळाची डिलिव्हरी मिळण्याआधीच कंपनीला संपूर्ण रक्कम अदा करणे यासारख्या नियमबाह्य बाबी चौकशीत समोर आहेत. एवढं सगळं रामायण घडून ज्या सभासदांसाठी संचालक मंडळाने हि नसती उठाठेव केली त्या सभासदांनीच या भेटीवर बहिष्कार टाकला असून अजूनही तब्बल 3500 घड्याळे विविध तालुक्यातील गॊदामांत पडून आहेत. या साठवण गोदामांचे भाडेरुपी भुर्दंड सामान्य सभासदालाच सहन करावा लागतोय. बँकेच्या एम. डी नी दिलेल्या माहितीनुसार संचालकांनी सभासदांसाठीची घड्याळे आपल्या नातेवाईकात वाटल्याचं उघडकीस आलं आहे. कोणत्या संचालकांनी किती घड्याळे पळवली याची यादीच सदिच्छा मंडळाच्या हाती लागली असून सभासदांच्या अवलोकनार्थ हि यादीच सदिच्छा मंडळाने जाहीर केली आहे. यामध्ये संगमनेर शाखा- राजू रहाणे 19, किसन खेमनर 18, साहेबराव अनाप 1, अकोले शाखा- मुखेकर 7, गोडे 8, श्रीगोंदा शाखा-आर. टी. साबळे 7, अवि निंभोरे 8, श्रीरामपूर शाखा- बडाख 9, सलीमखान पठाण 14, कोपरगाव शाखा-खरात 6, आढाव 6, पाथर्डी शाखा-शिरसाठ 11, अकोलकर 6, भवार 6, राहुरी शाखा-अनाप 1, पारनेर शाखा - आर. टी. साबळे 2, कर्जत शाखा-सुद्रीक 6, जामखेड शाखा-निकम 6, नगर शाखा-अनाप 5, दुसुंगे 1, अरुण देशमुख 5, दिलीप मुरदारे 5, बापू तांबे 1, संदीप मोटे हस्ते आर. टी. साबळे 5 अशा 17 संचालकांनी तब्बल 146 घड्याळं लाटत आपल्या नातेवाईकांवर खैरात करत कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
चौकशी समितीसोबतच सामान्य सभासदासमोरही या घोटाळ्याचा पर्दाफाश करणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे अध्यक्ष माधव हासे, सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष नारायण राऊत, उत्तर विभाग प्रमुख चंद्रकांत मोरे, दक्षिण प्रमुख भास्कर कराळे, संघाचे कार्याध्यक्ष दादा वाघ, राजाभाऊ बेहळे, बबन गाडेकर, बाबा आव्हाड, बाळासाहेब डमाळ, बाळकृष्ण कंठाळी आदींनी दिली आहे.
Comments