अहमदनगर । वीरभूमी - 13-Mar, 2021, 12:00 AM
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचे अपहरण करून हत्या करणारे आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. अटक केलेल्या आरोपींमध्ये नाशिक जिल्ह्यातील तीन तर कोपरगाव तालुक्यातील एका आरोपीचा समावेश आहे. या आरोपींनी व्यापारी हिरण यांचे 1 मार्च रोजी अपहरण केले होते तर दि. 7 मार्च रोजी त्यांचा मृतदेह वाकडी शिवारात आढळून आला होता.
अटक केलेल्या आरोपीमध्ये संदीप मुरलीधर हांडे (रा. माळेगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक), जुनेद उर्फ जावेद बाबु शेख (रा. सप्तश्रृंगीनगर, नायगांव रोड, सिन्नर, जि. नाशिक), अजय राजू चव्हाण (रा. पास्तेगाव, मारुती मंदीरासमोर, सिन्नर, जि. नाशिक), नवनाथ धोंडू निकम (रा. उक्कडगाव, ता. कोपरगाव, जि. अ.नगर) व एक 22 वर्षीय आरोपी यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले.
व्यापारी गौतम हिरण हे 1 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता आपले बेलापूर येथील दुकान बंद करून दुचाकीवरून श्रीरामपूर येथील बोरावके नगर येथील घरी जात असतांना त्यांचे अपहरण झाले होते. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी गौतम हिरण यांची हत्या करुन त्यांचे प्रेत श्रीरामपूर ते वाकडी रोडवर यशवंत चौकी परिसरात आणून टाकल्याने दि. 7 मार्च रोजी अपहरणकर्त्या विरुध्द हत्या केल्याचे वाढीव कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांनी सदरचा गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून सदर गुन्ह्याचे तपासकामी वेगवेगळी पथके तयार करुन सदरचा गुन्ह्याचा वेगाने तपास केला.
आरोपींनी अपहरण करून कोणताही पुरवा मागे न सोडता व्यापारी गौतम हिरण यांची हत्या केली होती. यामुळे आरोपींचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक अनिल कटके यांचे मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करुन स्वत : पथकाचे नेतृत्व करुन गुन्ह्याचा तपास सुरु केला. अशा परिस्थितीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामधील अधिकारी व अंमलदार यांनी सहा दिवस अहोरात्र मेहनत घेवून तांत्रीक विश्लेषणाचे आधारे काही संशयित इसम निष्पन्न करुन त्यांचेवर लक्ष केंद्रीत करुन वरील आरोपींना अटक केली.
या गुन्ह्याच्या तपासाकामी तपासी अधिकारी पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांनी आरोपीकडून मयत गौतम हिरण यांचा मोबाईल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मारुती व्हॅन (क्र. एमएच- 15, जीएल 4387) असा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक केली.
gMpruvbySHLd