माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे निधन
अहमदनगर । वीरभूमी - 17-Mar, 2021, 12:00 AM
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे बुधवारी निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडलेली होती. दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. दिल्लीतील खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. दिलीप गांधी हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार होते.
दिलीप गांधी हे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील गांधी रुग्णालयातच होते. दरम्यान त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. मंगळवारीच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यांना मंगळवारी दुपारपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
दिलीप गांधी हे अहमदनगर भाजपचा चेहरा होते. त्यांच्या राजकारणाची सुरुवात पालिका निवडणुकीपासून झाली होती. सुरुवातीच्या काळात ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांची महापालिकेत भाजपच्या नेतेपदी निवड झाली.
1999 साली अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडूण आले. जानेवारी 2003 ते मार्च 2004 या काळात त्यांनी केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री पद भूषवले होते. यानंतरही ते 2009 व 2014 साली ते पुन्हा एकदा लोकसभेवर गेले होते.
HxOzpeBal