बसमध्ये 81 प्रवासी; प्रांताधिकार्यांकडून आगारास एक लाखाचा दंड
परभणी । वीरभूमी- 19-Mar, 2021, 12:00 AM
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मात्र सामान्य नागरिकांकडून मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
गुरुवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे एसटी बसमध्ये 81 प्रवासी प्रवास करत असल्याचे आढळून आले. शिवाय काही जणांनी मास्क लावला नसल्याने जिंतूर आगाराला 1 लाखांचा दंड करण्यात आला आहे.
ही कारवाई सेलूचे प्रांताधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार सखाराम मांडवगडे, नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी इंद्रजित चाळगे आदींचे संयुक्त पथकाने केली. हे पथक विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करत होते. या वेळी जिंतूर शहरात सप्तगिरी हॉटेलसमोर जिंतूर-लातूर या बसमध्ये (एमएच 20, बीएल 1922) तब्बल 81 जण प्रवास करत असल्याचे आढळले. बसमध्ये काही प्रवाशांनी मास्कही लावलेला नव्हता. शिवाय बसमध्ये एक कुत्र्याचे पिल्लू आढळून आले. त्यामुळे निष्काळजीपणाचा ठपका ठेवून आगाराला एक लाख रुपयांचा दंड करण्यात आला.
दंडाची रक्कम सोमवारपर्यंत भरायची आहे. दंड न भरल्यास आगारप्रमुखांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रांताधिकारी पारधी यांनी सांगितले.
कोरोना काळात लॉकडाऊननंतर प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली. परंतु यादरम्यान प्रवाशांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दक्षता म्हणून मास्क घालणे अपेक्षित असतानाही या काळात प्रवासी संख्या आणि काळजी घेण्याचे टाळले जात असल्याचे लक्षात येत आहे.
VruxbSoeWQjPp