पाथर्डी । वीरभूमी- 21-Mar, 2021, 12:00 AM
शनिवारी दुपारी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील काही गावात गारपीट होऊन शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची आमदार मोनिकाताई राजळे यांनी आज रविवारी पहाणी करत हतबल शेतकर्यांना दिलासा दिला.
नुकसानग्रस्त शेतकर्यांना धिर देत प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचानामे करण्याचे आदेश दिले. तसेच राज्य शासनाकडे नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिले.
पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील काही गावात शनिवारी दुपारी वादळी वार्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. त्यामुळे गहु, कांदा, हरभरा, ऊस, चारा पिके व आंबा, चिकु, संत्रा आदी फळ पिकांचेही नुकसान झाले. या नुकसानीचे आज रविवारी आमदार मोनिकाताई राजळे यांनी पहाणी करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना धीर दिला.
यावेळी त्यांच्या सोबत प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वाडकर, जि. प. सदस्य राहुल राजळे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, गोकुळ दौंड आदीसह कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक व कार्यकर्ते उपस्थित होते.
रविवारी सकाळी पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी येथून आ. राजळे यांनी पहाणीला प्रारंभ केला. या पहाणीमध्ये साकेगाव काळेगाव, सुसरे, प्रभूपिंप्री, पागोरी पिंपळगाव, सांगवी बुद्रुक, सांगवी खुर्द, खेर्डे, माळेगाव, निपाणी जळगाव, कोरडगाव, कोळसांगवी, जिरेवाडी, सोनोशी तसेच शेवगाव तालुक्यातील आखेगाव तीतर्फा व आखेगाव डोंगर या गावातील नुकसानग्रस्त भागांची पहाणी केली.
यावेळी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश आ. मोनिकाताई राजळे यांनी देत नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
Comments