शेवगाव । वीरभूमी- 21-Mar, 2021, 12:00 AM
मारहाण करणार्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उत्तरीय तपासणी केलेला मृतदेह शेवगाव पोलिस ठाण्यात आणणार्या शेवगाव तालुक्यातील ठाकुर पिंपळगाव येथील सुमारे 30 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी मारहाण करणार्या पाच जणांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले.
मात्र त्यानंतर काही तासातच मयताचे वडील, भाऊ व नातेवाईक अशा तब्बल 30 जणांवर शेवगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील ठाकुर पिंपळगाव येथील हरिभाऊ पांडुरंग बडधे (वय 42) यांना शुक्रवारी सायंकाळी काही जणांनी मारहाण केली होती. या मारहाण करणार्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, म्हणुन मयताचे नातेवाईक यांनी पोलिस निरिक्षक प्रभाकर पाटील यांच्याशी चर्चा करत असतांना यातील काही जणांनी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात जावून उत्तरीय तपासणी केलेला हरिभाऊ बडधे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून आणुन पोलिस ठाण्याच्या आवारात आणून ठाणे अंमलदार यांच्या समोरील जागेत ठेवून प्रेताची हेळसांड व अवहेलना केली.
तसेच जिल्हाधिकारी यांचे जमाबंदी आदेशाचे उल्लंघन करत गर्दी करून जीवितास धोका निर्माण होईल अशा रितीने पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी जमवून खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गोंधळ घातला.
याप्रकरणी नारायण पांडुरंग बडधे, गोरक्षनाथ तुकाराम कांदे, संदीप नारायण खेडकर, पांडुरंग बडधे, पंडीत कंठाळे, नितीन खेडकर, रंगनाथ कांदे, विठ्ठल खेडकर, संजय अशोक खेडकर, सनदीप पोपट सोनवणे, योगेश कंठाळे, अमोल खेडकर, छोट्या बडधे, आण्णा गिज्ञानदेव बडधे व इतर अनोळखी 10 ते 15 इसम (सर्व रा. ठाकुर पिंपळगाव, ता. शेवगाव) यांच्यावर ठाणे अंमलदार पोना. आण्णा तुळशिराम पवार यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणणे, जमाबंदीचे उल्लंघन करणे, मृतदेहाची विटंबना करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments