‘कोव्हिशिल्ड’ लस घेतली असेल अथवा घेणार असाल तर हे वाचा
नवी दिल्ली - 22-Mar, 2021, 12:00 AM
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्याही वाढतेय. सरकारकडून लसीकरण मोहीमही अधिक वेगवान करण्यात आलीय. अशावेळी कोरोना लसीबाबत केंद्र सरकारने नवी गाईडलाईन जारी केली आहे.
त्यानुसार आता कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या नव्या गाईडलाईननुसार कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर आता 4 आठवड्यांऐवजी 6 ते 8 आठवडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशात सुरु असलेल्या लसीकरणासाठी सध्या दोन लसींचा वापर केला जात आहे. त्यात पहिली भारतातील लस निर्मिती कंपनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि दुसरी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड या लसींचा समावेश आहे. यात कोव्हिशिल्ड बाबत केंद्र सरकाने नवी गाईडलाईन जारी केली आहे. त्यानुसार कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस आता 4 आठवड्यांऐवजी 6 ते 8 आठवड्यानंतर दिला जाणार आहे.
नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन ईम्यूनायजेशन आणि नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन वॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फ़ॉर कोविड-19 या बैठकीत घेतलेल्या निर्णयानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला तसे करण्याचा सल्ला देण्यात आला. या सल्ल्याचा विचार करत केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या पहिला डोस आणि दुसर्या डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्राने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
कोविशिल्डचा दुसरा डोस 6 ते 8 आठवड्यांच्या दरम्यान दिल्यास अधिक लाभदायक फायदे होतील असा तज्ञांचा अहवाल आहे. या संदर्भात, आज केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आतापासून कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसर्या डोसमधील अंतर किती असावे याचा उल्लेख केला आहे. सोबतच त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कोव्हिशिल्ड लसीबाबत जारी केलेली गाईडलाईन ही कोव्हॅक्सिनबाबत लागू असणार नाही. म्हणजे ज्या लोकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यांना चार आठवड्यानंतरच दुसरा डोस दिला जाणार आहे.
PcHQegILM