तहसीलदार शाम वाडकर यांचे आदेश
पाथर्डी । वीरभूमी - 24-Mar, 2021, 12:00 AM
तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे कोरोना बाधित रुग्णांची लागण सुरू होताच, ग्रामस्थांनी उद्यापासून तीन दिवस गाव व मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन जनता कर्फ्यू बाळगणार असल्याची माहिती तहसीलदार श्याम वाडकर यांनी दिली.
वाडकर म्हणाले की, तालुक्यातील शिरसाटवाडी येथे १९ मार्च रोजी रॅपिड टेस्ट मध्ये चौदा रुग्ण आढळल्यानंतर २३ ते २९ मार्च पर्यंत शिरसाठवाडी हे गाव कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सर्व व्यवहार देखील यादरम्यान बंद राहणार आहेत.यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्रपणे अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मढी येथील चैतन्य कानिफनाथ यांची यात्रा होळीपासून गुढीपाडवा पर्यंत चालते.प्रशासनाने यात्रा यापूर्वीच बंद केल्याने नाथांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक येथे येऊन दर्शन घेत आहेत. त्यामुळे साथ रोगाची लागण झाली असावी अशी ग्रामस्थांना शक्यता वाटते.त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी व देवस्थान समितीने प्रशासनाला जनता कर्फ्यू बाबत माहिती दिली.
होळीच्या दिवशी सायंकाळी कैकाडी समाजाला मानाची काठी मंदिराच्या कळसाला टेकवण्यासाठी फक्त पाच लोकांना प्रशासनाने परवानगी दिली असून, सायंकाळी मानाची होळी पेटवण्यासाठी गोपाळ समाजातील पाच मानकरी यांना परवानगी देण्यात आलेली आहे.
याशिवाय होळी, चतुर्थी, रंगपंचमी, नाथषष्ठी, अमावस्या, गुढीपाडवा या दिवशी प्रशासनाने जमाबंदी आदेशा सह यात्रा बंदी जाहीर केल्याने यात्रेकरूंची गर्दी आता वाढून संपूर्ण परिसर यात्रा मय बनला आहे.
स्थानिक प्रशासनाला यात्रेबाबत देवस्थान प्रशासनाकडून दैनंदिन माहिती मिळत नसल्याने भाविक बंदी आदेश मिळूनही गर्दी करतात. त्यामुळे प्रशासनाने आता मढी गावासाठी यात्रा होईपर्यंत पूर्णवेळ पोलिस व सक्षम नियंत्रक अधिकारी नियुक्त करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.
Comments