पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांच्या सुचना
पाथर्डी । वीरभूमी- 26-Mar, 2021, 12:00 AM
पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोना संसर्ग वाढत चालला असून पंचायत समितीच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत.
तालुक्यातील प्रत्येक गावांत ग्राम सुरक्षा समिती स्थापन करून गावामध्ये विनामास्क फिरणार्यांवर किमान 100 रुपये दंड करून ती वसुल करण्याचे आदेश पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शितल खिंडे यांनी तालुक्यातील 107 ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना दिल्या आहेत.
पाथर्डी तालुक्यात कोरोना संसर्ग हळू हळू वाढू लागला आहे. ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांनी तालुक्यातील 107 ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना उपाय योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशात म्हटले आहे की, सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असून ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. त्या अनुषंगाने ग्रामस्तरावर काही उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असून त्यात प्रामुख्याने ग्रामसुरक्षा समिती स्थापन व कार्यान्वित करणे आवश्यक आहे. त्यासोबतच गावात विना मास्क फिरणार्या लोकांवर दंडात्मक कारवाई करावी. जी लोक मास्क वापरणार नाहीत त्यांना किमान 100 रुपये दंड करून दंडाची रक्कम वसूल करावी व 100 टक्के मास्क वापर सुरू होईल ते पहावे.
यासाठी ग्रामपंचायतस्तरावरील ग्रामपंचायत कर्मचारी यांना योग्य त्या सूचना देऊन वरील मास्क न वापरणार्या बाबतची कार्यवाही सर्व 107 ग्रामपंचायतींमध्ये सुरू करावी व त्याचा दररोज अहवाल पंचायत समितीला कळवावा. त्यासोबतच सोशल डिस्टन्सिंग, हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा नियमित वापर आणि मास्क याबाबत ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. (यामध्ये माईकवर अनाउन्सिंग, अॅपे रिक्षा मार्फत ऑडिओ क्लिप मार्फत जनजागृती, गावात दोन-तीन ठिकाणी डिजिटल बॅनर लाऊन जनजागृती करणे, या उपाय योजना करणे आवश्यक आहे).
तसेच 4 पेक्षा जास्त लोक एकत्रित येणार नाहीत, या बाबतची देखील दक्षता घेण्यात यावी. मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन सर्व ग्रामपंचायतस्तरावर सर्व कर्मचार्यांनी करावे. असे आदेश गटविकास अधिकारी शितल खिंडे यांनी दिले आहेत.
QmFxhelTftIDs