मुंबई- 30-Mar, 2021, 12:00 AM
माणसाच्या जीवापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नसते. लॉकडाऊन हा मुख्यमंत्र्यांनाच काय राज्यातील कोणत्याही व्यक्तीला नकोच आहे.
मात्र, तशी वेळ आल्यास लॉकडाऊनचा पर्याय वापरावा लागतो, असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका खाजगी दूरचित्र वाहिनीशी बोलतांना स्पष्ट केले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, लॉकडाऊनच्या निर्णयावरुन महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. लॉकडाऊन हा कोणालाही प्रिय नसतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही तशी इच्छा नाही. महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीला पुन्हा लॉकडाऊन लागावा, असे वाटत नाही. पण आपल्याकडे ‘तहान लागल्यावर विहीर खोदायची’, अशी एक म्हण आहे. तशी परिस्थिती ओढावू नये म्हणून आपण तयारी करत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात दररोज 35 ते 40 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असेल तर तशी बेडसची व्यवस्था आहे का, हे पाहावं लागेल. परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊनसारखा पर्याय वापरावा लागेल, असेही टोपे यांनी म्हटले.
लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. मात्र, वेळ पडल्यास विचार करायला हरकत नाही. मात्र, गेल्यावेळप्रमाणे लॉकडाऊन सरकारला परवडणार नाही. असंघटित कामगार आणि उद्योगधंद्यांना आपल्याला बेरोजगार करायचे नाही. सध्या आम्ही असंघटित कामगार आणि उद्योगांवर कशा पद्धतीने निर्बंध लादून काम सुरु ठेवू शकतो, याचा विचार करत आहोत.
आपण सरकारी आणि खासगी कार्यालयात 50 टक्के कर्मचारी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाची साखळी तोडून रुग्णांची संख्या कमी करणे, आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
लसीकरणाच्या मोहीमेत देशभरात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. हा लसीकरणाचा वेग अधिक वाढवायचं आहे. सर्व राजकीय पक्षांना, सामाजिक कार्यकर्त्यांना मतदानाला मतदार काढतो त्या पद्धत यांनी वॉर्ड स्तरावर आपापल्या बूथवरन त्याना मतदानाला घेऊन जातो त्या पद्धतीने सर्वांना लसीकरणात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.
राज्यात व्हेंटिलेटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटर राज्यातल्या सगळ्या रूग्णालयात उपलब्ध आहेत.
ऑक्सिजनची मागणी वाढत असल्यामुळे आम्ही 80 टक्के निर्माण होणारा ऑक्सिजन आरोग्य सेवेसाठी उपलब्ध करुन दिला पाहिजे, असे आदेश दिल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
xAvPJorDWFfRqpy