अकोले । वीरभूमी - 03-Apr, 2021, 12:00 AM
मजुरी करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या रखमाबाई पथवे व त्यांच्या कुटुंबावर अचानक जळीताची आपत्ती कोसळली असून हे कुटुंब रस्त्यावर आले. ग्रामस्थांनी व इतरांनी या कुटुंबावर ओढवलेल्या संकटसमयी मदतीची भूमिका घेऊन त्यांचे पुनर्वसनासाठी आर्थिक व इतर मदत करावी, असे आवाहन करत माजी आ. वैभव पिचड यांनी करत इतर साहित्यासह २१ हजार रूपयांची मदत करत, मी सदैव या गरीब कुटुंबासोबतच आहे, अशी धीर देणारी आपुलकीची भावना व्यक्त केली.
काल अकोले तालुक्यातील कोंभाळने येथील ठाकर वस्तीला आग लागून त्यात चार घरे आगीमध्ये भस्म झाले. सुमारे सहा लाखाचे नुकसान झाले.
पीडित कुटुंबाचे युवराज गावंडे यांनी तातडीने या घटनेची माहिती माजी आमदार वैभवराव पिचड यांना दिली. व श्री पिचड यांनी तातडीने या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तहसीलदार व प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास यांचेशी संपर्क साधून मदतीचे आवाहन केले.
तर आज सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी पोहचून या गरीब पीडित आदिवासी कुटुंबाला किराणा साहित्य, चार मोठ्या ताडपत्र्या व २१ हजार रुपये रोख दिली व शासनाची मदत येईल तेव्हा येईल अगोदर तुम्ही सावरण्यासाठी ही मदत देत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समिती सभापती सौ. उर्मिला राऊत, उपसभापती दत्तात्रय देशमुख, सोमनाथ मेंगाळ, भरत मेंगाळ, सुरेश भांगरे, शंभू नेहे, दिनेश शहा, सरपंच, उपसरपंच व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रखमाबाई, शेवंताबाई, शिवाजी पथवे यांना आपले अश्रू आवरता आले नाही.
तातडीने मदत कशी करता येईल याबाबत गटविकास अधिकारी डी .डी. सोनकुसळे यांनी घरकुल योजनेतून या पीडित कुटुंबाला मदत देण्यासाठी प्रस्ताव करण्याचे पिचड यांनी सांगितले.
उपस्थित असलेल्या अनेकांनी वैभव पिचड यांच्या आवाहनाला साथ करत मदत दिली .आपण या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही यापुढेही माझी मदत व साथ राहील असे वैभवराव पिचड म्हणाले.
zEVgMwflWpDkByrY