ब्रेक द चेन : आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे
ब्रेक द चेन : आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे
मुंबई । वीरभूमी - 09-Apr, 2021, 12:00 AM
राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे.१. डी मार्ट, रिलायंस, बिग बाजार सारखे मॉल्स उघडे राहणार का ?
४ आणि ५ एप्रिल रोजी राज्य शासनाने निर्बंधांबाबत आदेश काढले आहेत. जी दुकाने, मॉल्स यातील आवश्यक / जीवनावश्यक वस्तू विक्री करीत आहेत ते सुपर मार्केट्स, मॉल्स सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरु राहू शकतील. आवश्यक नसलेल्या वस्तूंचे विभाग बंद राहतील.
२. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या (वीकेंड) लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहील आणि काय बंद ?
ब्रेक द चेनच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे आवश्यक सेवा सुरु राहतील. कोणताही व्यक्ती योग्य कारणांशिवाय फिरू शकणार नाही. ही कारणे आदेशात नमूद आहेत.
३. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या (वीकेंड) लॉकडाऊमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरु राहतील काय ?
कोविडसंदर्भातील सर्व आरोग्याचे नियम पाळून सुरु राहू शकतील. मात्र नियमांचे पालन होत नाही हे लक्षात आले तर स्थानिक राज्य शासनाची परवानगी घेऊन बाजार बंद करू शकतात. स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात काटेकोर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे.
४. बांधकाम दुकाने उघडी राहतील का ? उत्तर : बांधकाम साहित्याची दुकाने बंद राहतील.
५. वाहनांची दुरुस्ती करणारे गॅरेजेस, ऑटोमोबाईल दुकाने उघडी राहतील का ? उत्तर: वाहतूक सुरु असल्याने दुरुस्ती करणारी गॅरेजेस सुरु राहू शकतील. मात्र, त्यांनी कोविडविषयक आरोग्याच्या नियमांचे पालन करायचे आहे. याच्याशी संबंधित दुकाने मात्र बंद राहतील. कोविड नियम न पाळणारी गॅरेजेस कोविड संसर्ग असेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.
६. केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना (पीएसयू) आवश्यक सेवा म्हणून संबोधता येतील का ?
उत्तर : नाही. सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पीएसयू हे आवश्यक सेवेत येत नाहीत. आवश्यक सेवेत समाविष्ट असणारेच केंद्र शासनाचे विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील या सेवेतील समजले जातील.
७. नागरिक मद्य खरेदी करू शकतात का ? उत्तर : हो. नागरिक हे ४ एप्रिल रोजी उपाहारगृहे आणि बारसाठी काढलेल्या आदेशाप्रमाणे निर्धारित वेळेत बारमधून टेक अवे पद्धतीने किंवा होम डिलिव्हरीने मद्य खरेदी करू शकतात.
८. मद्यविक्री दुकान सुरु राहू शकतील का? होम डिलिव्हरी होऊ शकेल का ? उत्तर : नाही.
९. रस्त्याकडेचा ढाबा सुरु राहू शकतो का ? उत्तर : हो. पण उपाहारगृहांप्रमाणेच बसून जेवण करण्यास परवानगी नाही. पार्सल नेऊ शकतात.
१०. इलेक्ट्रिक उपकरणांची दुकाने (एसी, फ्रीज इत्यादी) सुरु राहू शकतील का? उत्तर : नाही.
११.दूरसंचारशी सबंधित (डेस्कटॉप, मोबाईल इत्यादी) सुरु राहू शकतील ? उत्तर : नाही.
१२. आपले सरकार, सेतू केंद्रे सुरु राहू शकतील ? उत्तर : हो. आठवड्याच्या दिवशी (वीक डेज) सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहू शकतात.
१३. आठवड्याच्या शेवटी रात्री ८ नंतर किंवा सकाळी ७ च्या आत उपाहारगृहे होम डिलिव्हरी करू शकतात का ? उत्तर : आठवड्याच्या नियमित दिवशी ग्राहक उपाहारगृहांतून सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत पार्सल घेऊन जाऊ शकतात.
या निर्धारित वेळेनंतर तसेच आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत (वीकेंड) ग्राहक पार्सल घेऊ शकणार नाही. मात्र ई कॉमर्समार्फत तसेच उपहारगृहातून होम डिलिव्हरीमार्फत खाद्यपदार्थ मागवता येईल
INrxSwlMejUTEov