कोरोना रोखण्यासाठी पहिल्या लाटेत केलेल्या उपाय योजना अंमलात आणाव्यात
कोरोना रोखण्यासाठी पहिल्या लाटेत केलेल्या उपाय योजना अंमलात आणाव्यात
कर्जत । वीरभूमी- 10-Apr, 2021, 12:00 AM
कर्जत शहरात आणि तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर रूप धारण करीत असून दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधीत रुग्ण आढळत आहेत. यावर प्रशासनाने गांभीर्याने विचार करून उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्या पद्धतीने कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक- नगरसेविका, मुख्याधिकारी आणि सर्व कर्मचारी यांनी जे नियोजन केले होते त्याच पद्धतीचे नियोजन पुन्हा अंमलात आणले तर निश्चित कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येऊ शकते.जर स्थानिक प्रशासनाने सेवाभावी वृत्तीने पुन्हा संधी दिल्यास आम्ही सर्व सहकार्य करण्यास तयार आहोत, या आशयाचे निवेदन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना दिले असल्याची माहिती उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सध्या कर्जत शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधीत रुग्णाची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. पहिल्या कोरोना लाटेत कर्जत नगरपंचायतीचे पदाधिकारी, सर्व स्थानिक अधिकारी- कर्मचारी यांनी लोकाभिमुख कार्य करीत अनेक दिवस कर्जत शहर आणि तालुका कोरोना मुक्त ठेवण्यात यश मिळवले होते. तीच पद्धत आणि उपाययोजना पुन्हा अंमलात आणल्यास निश्चित दुसरी कोरोना साखळी देखील रोखण्यात मदत मिळेल. असा विश्वास उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास त्यांच्या कुटुंबातील, संपर्कातील व्यक्तीचा शोध नगरपंचायत व आरोग्य कर्मचारी यांनी घेत त्यांची कोरोना चाचणी तात्काळ करून घ्यावी. यासह त्या भागात आणि परिसरात कोरोना चाचणी जनजागृती मोहीम राबविणे. तसेच त्या रुग्णाचे घर, परिसर तात्काळ निर्जंतुकीकरण करण्यात यावे. अत्यावश्यक सेवा देणार्या मेडिकल, किराणा दुकान यासह इतर दुकानासमोर सुरक्षित अंतर पाळण्यासाठी दोन मीटरचे वर्तुळ आखण्यात यावे.
कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावर, उपनगर रस्त्यावर कोरोना जागृती विषयक संदेश रेखाटल्याने नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होते. विनामास्क फिरणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईसाठी नगरपंचायत कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचे पाच पथके तयार करावे. शहरातील शासकीय कार्यलय, सार्वजनिक ठिकाणी, बँक- दवाखाने यांच्या समोर पूर्वी नगरपंचायतमार्फत ठेवण्यात आले हॅन्डवाश स्टेशन पुन्हा कार्यान्वित करावे यासह आणखी सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी नव्याने हॅन्डवाश स्टेशन निर्माण करावे. अत्यावश्यक सेवाच्या नावाखाली शहरात विनाकारण नागरिक फिरत आहे. म्हणून अत्यावश्यक सेवेमध्ये असणारे दुकाने सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंतच सुरू ठेवण्यात यावे.
यासह शहरातील मेडिकल सुद्धा याच वेळेत सुरू ठेवावे फक्त दररोज वेगवेगळी दोन मेडिकल अत्यावश्यक रुग्णासाठी सुरू ठेवावेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिकांनी ही दिवसातील काही ठराविक वेळ शासकीय निर्बंध पाळत उघडण्याची परवानगी द्यावी वरील सर्व उपाययोजनाची प्रशासनाने अंमलबजावणी केली तर कोरोनाची दुसरी साखळी देखील अल्पावधीतच रोखण्यात यश मिळेल.
शहरातील कोरोनाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी नगरपंचायत, आरोग्य विभाग यांची यंत्रणा आपल्या मदतीला दिल्यास पंधरा दिवसात कर्जत नगरपंचायत हद्दीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करू या आशयाचे निवेदन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी दिले आहे.
या पत्रकार परिषदेस महासंग्राम युवा मंचचे भारत मासाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य अमृत काळदाते, अनिल गदादे, विनोद दळवी उपस्थित होते.
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कोरोना काळात डॉ. सुचेता यादव यांनी उत्कृष्ट काम करीत रुग्णसेवा दिली होती. मात्र त्यांची बदली झाल्याने कर्जत उपजिल्हा रुग्णालयास त्यांची कमतरता जाणवत आहे. अशा जनताभिमुख कार्य करणार्या वैद्यकीय अधिकार्याची बदली होणे शहराच्यादृष्टीने योग्य नाही.
तरी शासनाने आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी यादव यांना पुन्हा कर्जतला नियुक्ती द्यावी असे आवाहन नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
ZGbYaPjLpmvSTBfy