टाकळी मानुर । वीरभूमी- 11-Apr, 2021, 12:00 AM
पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर येथून ऊसाने भरलेला डबल ट्रॉली असलेला ट्रॅक्टर करोडी येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागे पटली होऊन झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला. हा अपघात उसाने भरलेल्या दोन्ही ट्रॉली एकमेंकावर आदळल्याने झाला.
या अपघातात ठार झालेल्या चाकाचे नाव भाऊराव भास्कर काळे (वय 19, रा. बंगाली पिंपळगाव, ता. गेवराई, जि. बीड) असे आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर येथील भागवत टेकाळे यांचा ऊस वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला तोडून चालला होता. आज नेहमीप्रमाणे तोडलेला ऊस ट्रक्टरला दोन ट्रॉली जोडून नेला जात होता.
ऊसाने भरलेला ट्रक्टर टाकळी मानूर - पाथर्डी रस्त्याने कारखान्याकडे चालला असता करोडी येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागे असलेल्या उतारावर दोन्ही ट्रॉली एकमेकांवर आदळून अपघात झाला. या अपघातात ऊसाने भरलेल्या ट्रॉली ट्रक्टरवर आदळून ट्रौक्टर पलटी झाला. यामध्ये भाऊराव भास्कर काळे (वय 19, रा. बंगाली पिंपळा, ता. गेवराई, जि. बीड) हा जागीच ठार झाला.
ट्रॅक्टर पलटी झालेला पाहून नागरिकांनी उसाच्या मोळ्या बाजूला फेकून ढिगार्याखाली अडकलेल्या चालकास बाहेर काढले व पाथर्डी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
तेथे उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यावर बंगाली पिंपळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पाथर्डी पोलिसांत अकस्मात मृत्यू रजि. नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ बडे हे करत आहे.
पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील टाकळीमानुर, तांबेवाडी, गाडेवाडी, चुंभळी, भागात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात पंधरा दिवसापासुन तीन ट्रॅक्टर मजूर ऊसतोडणीसाठी आले होते. फलटण येथील शरयू अॅग्रो या साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपल्यानंतर हे मजूर या भागात ऊसतोडणीसाठी आले आहेत.
किमान एक महिनाभर आपल्याला काम भेटून रोजगार मिळेल या आशेने आलेल्या मजुराला दुदैवाने जीव गमवावा लागला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ASyaJWVvwbrDtN