राज्यात उद्या रात्रीपासून संचारबंदी; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद
अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ मोफत
मुंबई । वीरभूमी - 13-Apr, 2021, 12:00 AM
राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 दिवसांसाठी संचारबंदी व कडक निबरंध लागू करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी उद्या रात्री 8 वाजल्यापासून होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असून या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद असणार असून अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ मोफत दिला जाणार असून शिवभोजनही महिनाभर मोफत असणार आहे. तसेच बांधकाम कामगार, अधिकृत फेरीवाले, परवानाधारक रिक्षा चालक यांना 1500 रुपये देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.राज्यात करोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयानक असून तिसर्या लाटेचा विचार करवत नाही. दररोज 50 हजारांवर नवीन रुग्णांची भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. राज्यातील सर्वच प्रमुख शहरांत उपचारांसाठी मोठ्या पमाणात सुविधा निर्माण करण्यात आल्या असतानाही त्या अपुर्या पडू लागल्या आहेत.
ही स्थिती लक्षात घेता कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याची नितांत आवश्यकता आहे व त्यासाठीच लॉकडाऊन नव्हे तर कडक निर्बंध व संचारबंदीचे पाऊल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उचलले आहे. संचारबंदी व कडक निर्बंध जाहीर करतानाच अनेक महत्त्वाच्या घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. हातावर पोट असणार्या घटकांना त्यात आर्थिक दिलासा देण्यात आला आहे.
एमपीएससी तसेच दहावी व बारावीच्या परीक्षा आम्ही पुढे ढकलल्या आहेत. मात्र कोरोनाची परीक्षा आपण पुढे ढकलू शकत नाही. ती परीक्षा आपल्याला उत्तीर्ण व्हावीच लागेल. त्यासाठी मी गेल्या काही दिवसांपासून समाजातील प्रत्येक घटकाशी चर्चा करत आहे. त्यांच्याशी संवाद साधला. एकमत करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यात अनेक मतप्रवाह आहेत. मात्र मतमतांतरे किती काळ चालणार हा प्रश्न असून आता वेळ दवडून चालणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले.
राज्यात आपण मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उभ्या केल्या आहेत. मात्र, त्या सुविधाही आज कमी पडत आहेत. राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ऑक्सिजनची आणखी गरज भासणार आहे. त्याबाबत केंद्र सरकारकडे आम्ही मागणी केली आहे. त्यांनी जे पर्याय दिले आहेत तिथून ऑक्सिजन महाराष्ट्रात आणणे खर्चिक आणि वेळखावू आहे. त्यामुळे हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे व तशी मागणी आपण पंतप्रधानांकडे करणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
राज्य सरकार म्हणून अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना एक महिन्यासाठी प्रत्येकी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देणार आहोत. या योजनेमध्ये सात कोटी नागरिकांचा समावेश आहे. दहा रुपयांची शिवभोजन थाळी पाच रुपयांवर आणली होती. पुढचे काही दिवस शिवभोजन थाळी मोफत देणार आहोत.
संजय गांधी निराधार, श्रावळ बाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्ती योजना अशा पेन्शन लाभार्थ्यांना 1 हजार रुपये आगाऊ देणार आहोत. यामध्ये 35 लाख लोकांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य इमारत कामगार कल्याण मंडळ आहे. त्यात 12 लाख लाभार्थी आहेत. त्यांना 1500 रुपये देणार आहोत.नोंदणीकृत घरेलू कामगार यांना निधी देणार आहोत. अधिकृत फेरीवाले यांना एका वेळेचे 1500 रुपये देत आहोत. यांची संख्या 5 लाख आहे. रिक्षा चालकांना 1500 रुपये देत आहोत. यांची संख्या 12 लाख आहे. आदिवासी कुटुंबाना प्रति कुटंब 2000 रुपये देत आहोत. त्यांची संख्या 12 लाख आहे. कोविड संदर्भातील उभारणीसाठी जिल्हाधिकार्यांना अतिरिक्त निधी 3300 कोटी कोविडसाठी बाजूला काढून ठेवत आहोत. हे सगळ करण्यासाठी पाच हजार चारशे कोटी रुपये निधी बाजुला काढून ठेवत असल्याचे सांगितले.
तसेच राज्य सरकारतर्फे अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू, 1 किलो तांदूळ 1 महिन्यासाठी मोफत. रोजी थांबली असली तरी रोटी थांबणार नाही. नोंद केलेले लाभार्थी आहेत, ते 7 कोटी आहेत. या सर्वांना 1 महिना 3 किलो गहू आणि 1 किलो तांदूळ मोफत देणार आहे. शिवभोजन थाळी 10 रुपयात देत होतो. ही योजना कोव्हिड आल्यानंतर 5 रुपयात केली. आता शिवभोजन थाळ्या गोरगरिबांना मोफत देण्यात येणार आहे.
उद्या संध्याकाळपासून ब्रेक द चेनसाठी राज्यात 144 कलम लागू करण्यात आले असून पुढचे किमान 15 दिवस राज्यात संचारबंदी असणार आहे. यामुळे अनावश्यक येणे जाणे पूर्ण बंद. कोणत्याही व्यक्तीला अतिआवश्यक काम नसेल तर बाहेर पडू देऊ नका. सकाळी 7 ते रात्री 8 या काळात अत्यावश्यक सेवाच सुरु राहतील.
सार्वजनिक वाहतूक सुरु राहील, ती केवळ जीवनावश्यक सेवा देणार्यांसाठीच असणार आहे. औषधे, लस उत्पादक, अत्यावश्यक सेवा देणारे, मास्क वितरक, वैद्यकीय लोक, जनावरेंशी संबंधित दवाखाने उघडी राहतील. पत्रकारांनाही सूट असेल. पेट्रोल पंप सुरु राहतील. हे वगळता सर्व बंद राहील. बांधकामं जिथे सुरु आहेत, तिथेच कर्मचार्यांची राहण्याची सुविधा करा. त्यांना वाहतूक करु देऊ नका. थोडी वाहतूक सुरु ठेवत असाल तर बांधकाम उद्योग चालू ठेवू शकता. हॉटेल रेस्टॉरंटवर पूर्वीप्रमाणे निर्बंध, होम डिलिव्हरी सुरु राहील. रस्त्यावरील खाद्यपदार्थांना सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत मुभा आहे.
Tags :
JzuqBnImxUp