कुणी बेड देता का बेड!! रुग्णालये हाऊसफुल्ल झाल्याने नातेवाईक हतबल
श्रीगोंदा । विजय उंडे- 13-Apr, 2021, 12:00 AM
श्रीगोंदा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रोज 100 च्या पुढे नव्या कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडत आहे. दोन दिवसांत दोन रुग्णांचा बळी गेला आहे. तालुक्यात विविध गावांमध्ये 562 रुग्ण सक्रिय आहेत. कोविड केंद्र, खाजगी रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये खचाखच भरली आहेत. त्यामुळे संक्रमित आलेल्या नवीन रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागाच शिल्लक नसल्याने कुणी बेड देता का बेड म्हणत रुग्णाच्या नातेवाईकांना दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे.
बुधवारी एका तरुण मित्राला अत्यवस्थ वाटत असल्याने ग्रामीण रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणीसाठी आणले होते. चार दिवसांपूर्वी दोनदा रॅपिड अँटीजन चाचणी घेतली परंतु या चाचणीत तो दोनदा निगेटिव्ह आल्याने घरीच सर्दी-खोकल्यावर औषध घेऊन आराम करत होता. परंतु श्वास घ्यायला त्रास होत असल्याने घशातील स्रावाची चाचणी दिली. रॅपिड अँटीजन चाचणीच्या खात्रीवर शंका निर्माण झाली आहे. घशातील चाचणीचा अहवाल यायला चार-पाच दिवस लागणार होते. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले की, ऑक्सिजन पातळी खालावल्याने कुठेतरी अॅडमिट करून उपचार सुरू करा.
श्रीगोंदा येथील कोविड उपचार करणार्या कोविड केंद्र व ग्रामीण रुग्णालये व मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयात बेडसाठी चौकशी सुरू केली परंतु सर्वच ठिकाणी हॉस्पिटल हाऊसफुल असल्याने हॉस्पिटलच्या संचालकांनी दिलगिरी व्यक्त करून बारामती, नगर, दौंड व पुण्याला जाण्याचा सल्ला दिला. परंतु फोनाफोनी करून सगळीकडे नकारघंटा वाजू लागली. तेंव्हाच जाणवले की, किती भयानक परिस्थिती आहे.
बारामती येथील खाजगी रुग्णालयात महत्त्वाच्या चाचण्या घेतल्यावर ऑक्सिजन बेडची नितांत गरज पाहून जवळपासच्या सर्व रुग्णालयात चौकशी केली. परंतु कुठेही ऑक्सिजन बेड शिल्लक नव्हते. अखेर मित्राच्या नातेवाईकाच्या नगर येथील हॉस्पिटलमध्ये कशीबशी जागा मिळाली व सुटकेचा निःश्वास टाकला.
प्रत्यक्ष अनुभवल्यावर आपल्या लक्षात येते की, खरंच किती भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या कुटुंबात कोरोना संक्रमित रुग्ण सापडतो त्यांची काय हालत होत असेल? आणि गोर-गरीब रुग्णांचा विचार केला तर कल्पनाच करवत नाही!!. सगळीकडे ऑक्सिजन, रेडिमीसीवर इंजेक्शनचा तुटवडा, व्हेंटिलेटरची कमतरता अशा भयावह घटनांमधून सध्या वाटचाल चालू आहे. रोज बातम्यांमधून हजारो लोक पॉझिटिव्ह सापडत आहेत. तरीही कुणाला याची फिकीर नसल्यागत स्वसुरक्षेला तिलांजली...रोजची गर्दी, बेफिकीरपणा, महामारी काळात आणखी पैसे कमावण्याची हौस, इव्हेंट त्यामुळे हा रोग अधिकच पसरत चालला आहे. सरकारी मार्गदर्शक नियम पायदळी तुडवले जात आहेत. इतक्या मोठ्या लोकसंख्येपुढे प्रशासन तोकडे पडत आहे. त्यापेक्षा प्रत्येकाने आपणच आपली सुरक्षा केली तर.....
jkPMLotAXpcGTR