रमजान : ईश्वरीय कृपा वर्षावाचा महिना
श्री. लतिफ राजे । वीरभूमी - 14-Apr, 2021, 12:00 AM
आज मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. रमजान हा महिना मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे रोजा (उपवास) आहे.
त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात दानधर्म करून समाजातील दीनदुबळे, गरीब, विधवा आदींना मदतीचा हात देऊन त्यांचीही ईद आनंददायी करण्याचा प्रयत्न करतात.
म्हणूनच या महिन्याला ईश्वरीय कृपा वर्षावाचा महिना म्हणूनही ओळखले जाते.
इस्लामी तत्वप्रणाली नुसार श्रद्धेनंतर चार मूलभूत कर्तव्य पार पाडणे अनिवार्य करण्यात आले आहेत. यात 1) नमाज कायम करणे, 2) रोजा (उपवास) करणे, 3) जकात देणे आणि 4) ऐपत असल्यास हजला जाणे. नमाज, जकात किंवा हजला जाणे ही सर्व दृश्य आहेत, पण या सर्वांचे उलट रोजा ही एक अदृश्य व विशेष उपासना आहे. या महिन्यामध्ये मुस्लिम बांधव महिनाभर रोजा ठेवतात.
याच महिन्यामध्ये मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ “दिव्य कुरआन” अवतरला आहे. पवित्रग्रंथ दिव्य कुरआन केवळ मुस्लिमांसाठी नसून तो समस्त मानव जातीसाठी मार्गदर्शक आहे. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये जकात व फित्रा ही दिला जातो. रात्री तरावीहच्या नमाजमध्ये पवित्र ग्रंथ कुरआनचे पठण केले जाते. म्हणून हा महिना मुस्लिमांसाठी पुण्य कमविण्याचा मोठा मार्ग आहे.
रमजानचा महिना आला की सर्व वातावरण कसे प्रसन्न होऊन जाते. प्रत्येक मुस्लिम घराघरात चैतन्य निर्माण होते. पहाटे सहेरी केल्यानंतर उपवास सुरु होतो. तर संध्याकाळी गरीब नमाजच्या वेळी रोजा (उपवास) सोडला जातो. रोजेदार संपुर्ण दिवसभर ईश्वरीय आदेशाचे तंतोतंत पालन करीत असतो.
महिनाभर रोजा (उपवास) केल्याने रंजल्या गांजलेल्यांच्या दुःखाची जाणिव होते. चारित्र्य संपन्नतेचे संवर्धन हाच मुळी रोजाचा हेतू असल्याने तो साध्य झाल्यास त्यातून एका उच्च कोटीच्या महान समाजाची निर्मिती होऊ शकते.
- श्री. लतिफ राजे,
तालुका प्रतिनिधी, पारनेर.
मो. 9975699657
Comments