बोधेगावातही मिळणार कोरोना बाधित रुग्णांवर उपचार
बोधेगाव । उद्धव देशमुख- 16-Apr, 2021, 12:00 AM
शेवगाव तालुक्यात वाढत चाललेला कोरोना आणि होत असलेली सर्वसामान्य नागरिकांची ससेहोलपट पाहाता तालुक्याच्या पुर्व भागातील कोरोना बाधित नागरिकांना बोधेगावमध्येच उपचार मिळावे, त्यांना उपचारासाठी दारोदार फिरण्याची वेळ येऊ नये म्हणुन बोधेगाव येथे खाजगी सेवा करणार्या डॉक्टरांनी एकत्र येत बोधेगाव येथे ‘बोधेश्वर कोविड सेंटर’ उभारले आहे. या कोविड सेंटरचे उद्घाटन शनिवार दि. 17 रोजी होणार आहे.
आज सगळीकडे कोरोनाने हाहाकार माजवला असताना कोरोना बाधित रुग्णांना सहजासहजी बेड देखील उपलब्ध होत नाहीत. प्रत्येकजन ऑक्सिजन बेड आणि रेमडिसीवीर इंजेक्शनसाठी धावाधाव करताना दिसत आहे.
सगळी परिस्थिती भयानक होत असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणुस मात्र सगळीकडेच निराशेच्या खोल गर्तेत जाताना दिसत आहे.
त्यांना आधार, साथ व दिलासा मिळावा व त्यांना वेळेत योग्य उपचार मिळावेत म्हणून बोधेगाव येथील डॉ. प्रमोद जाधव, राजेंद्र कणसे, मनोज पारिख, अरुण भिसे, चंद्रशेखर घनवट, अजय कुलकर्णी, परमेश्वर गलांडे, निलेश मंत्री, दिपक फुंदे, दिपक जैन, ज्ञानेश्वर देशमुखसह पुंड अशा 12 डॉक्टरांनी एकत्रीत येत कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला.
कोविड सेंटरमध्ये शासकीय दरापेक्षा कमी बील आकारले जाणार आहे.तसेच कोविड सेंटर सुरू झाल्यानंतर दर तीन तसाला रुग्णांकडे जातीने लक्ष दिले जाणार असुन रात्री दोन डॉक्टर कर्तव्यावर राहणार आहेत. कोविड सेंटर मध्ये नर्स स्टाफ आणि कर्मचारी वर्ग देखील राहणार आहेत.
शासन नियमानुसार 4 हजार रुपये बेडची आकारणी आहे. परंतु बोधेश्वर कोविड सेंटर येथे अडीच हजार रुपयेच फी आकरण्यात येणार आहे. तसेच या कोविड सेंटरमध्ये 15 बेडची व्यवस्था करण्यात आली असुन यापैकी 10 बेड ऑक्सिजनचे आहेत.
रॅपिड अँटीजेन, आरटीपीसीआर आणि एचआरसीटीच्या आधारे कोविड रुग्णांना याठिकाणी प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
GrIkxLZtPufNOYQh