ऊस तोडणी मजूरांवर बिबट्याचा हल्ला
अकोले । वीरभूमी- 17-Apr, 2021, 12:00 AM
ऊस तोडणी सुरू असतांना बिबट्याने हल्ला केल्याने दोन ऊस तोडणी मजूर जखमी झाले. ही घटना आज शनिवार दि. 17 रोजी अकोले तालुक्यातील वाघापूर शिवारात दुपारी 2 वाजेच्या दरम्यान घडली.
या घटनेने ऊस तोडणी मजुरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी झालेल्या मजुरांची नावे शंकर मोतीराम पवार व संजय काळू सोनवणे असे असून हे दोन्ही ऊस तोडणी मजूर मालेगाव (जि. नाशिक) या भागातील आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अकोले तालुक्यातील वाघापूर शिवारात ऊस तोडणी सुरू होती. मजुर ऊस तोडत असतांना ऊसाच्या शेतातून अचानक आलेल्या बिबट्याने मजूर शंकर मोतीराम पवार व संजय काळू सोनवणे यांच्यावर हल्ला करत जखमी केले.
मूळचे मालेगाव (जि. नाशिक) या भागातील असलेल्या दोन ऊसतोडणी कामगारांच्या दोन्ही हाताच्या उजव्या बाजूला आणि बाहूला नख्यांनी खोलवर जखमा झाल्या आहेत.
दोन्ही जखमींना अकोले ग्रामीण रुग्णालयात उपरासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती समजताच वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती बी. एम. पोले यांनी वनकर्मचार्यांसह रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
वनविभागाने या गरीब ऊसतोडणी मजुरांना नुकसान भरपाई द्यावी, परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे.
qKYPUtLs