वीरभूमी - 18-Apr, 2021, 12:00 AM
‘इस्लाम’ या शब्दाचा अर्थच शांती असा होतो. पण ही शांती फक्त मर्यादित कुठल्याही एका व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी किंवा घराण्यासाठी नाही, तर समस्त विश्वासाठी आहे. म्हणून अल्लाहाने पवित्र रमजान महिना समस्त विश्वासाठी शांती, सुबत्ता व सहकार्याचा महिना ठरवला आहे.
आदरणीय अंतिम प्रेषित मोहम्मद (स.स) साहेबांच्या एका कथनानुसार रोजा केवळ उपासमारीचे नाव नव्हे. रोजा जिभेचा, कानांचा, डोळ्यांचा, हातापायांचा व बुद्धीविचारांचा आदी सर्व अवयवाचा असतो. या सर्वांचा रोजा पाळले शिवाय रोजेदाराचा रोजा पूर्ण होत नाही.
रोजेदार स्वतःच्या दैनंदिन कार्यात पदोपदी अल्लाहचे स्मरण त्याच्या आज्ञेनुसार संपूर्ण दिवस घालवतो. त्यामुळे त्याच्यात ईशभिरुता निर्माण होते. दिवसभराच्या कालावधीत त्यास अधून मधून तहान - भूक लागते तरी तो अन्नाचा घास किंवा पाण्याचा घोट देखील पित नाही.
कारण त्यांची दृढ धारणा बनलेली असते की, ज्या अल्लाहच्या आज्ञा तो पाळतो. ज्याच्यासाठी रोजा आठवतो. तो अल्लाह काही आंधळा किंवा बहिरा नाही. अल्लाह तर सर्वज्ञ आहे, त्रिकालवर याची नजर व पकड आहे.
मात्र रोजे करताना खाणे-पिण्यापासून 14 तास वंचित राहिल्याने रोजेदारास खाणेपिणे पासून सदैव वंचित राहत असलेल्या दीनदुबळ्यांच्या दुःखाची, त्यांच्या उपासमारीची जाणीव करून देणे हाही रोजा मागचा हेतू आहे.
रोजातून अल्लाह रंजल्या-गांजलेल्यांच्या दुःखाची जाणीव करून देतो. यातून रंजल्या - गांजलेल्यांना मदत करण्याची भावना निर्माण होते. समस्त मानवांमध्ये प्रेमाची, विश्वबंधुत्वाची व त्यागाची भावना निर्माण होते.
आदरणीय प्रेषित मुहम्मद (स. स.) साहेब यांनी एका ठिकाणी मुस्लिमांची व्याख्या स्पष्ट केली असून. त्यातून ही बाब स्पष्ट होते की, मुस्लिम व्यक्ती स्वतःपुरता विचार न करता समस्त मानवजातीचा विचार करते. प्रेषित मोहम्मद (स. स.) साहेब म्हणतात
अल्लाहाची शपथ, तो मुस्लिम नाही !
अल्लाहाची शपथ, तो मुस्लिम नाही !! .
अल्लाहाची शपथ, तो मुस्लिम नाही !!!
जो स्वतः पोट भरून खातो मात्र त्याचा शेजारी (तो कुठल्याही जाती-धर्माचा असो) जो उपाशी पोटी झोपतो. शेजारी-पाजारी तर लांबच, आज समाजातील काही घटक जन्मदात्या मातापित्यांची वृद्धाश्रमात रवानगी करतात तर शेजारीपाजार्याची कोण चौकशी करणार? मातापिताच तुझे स्वर्ग आणि मातापिताच तुझे नर्क. आईच्या चरणाखाली स्वर्ग आहे, या प्रेषित मोहम्मद (स.स.) यांच्या
शिकवणीची आज समाजाला नितांत गरज आहे.
रमजान महिन्यात दिल्या जाणार्या सदक-ए फित्र व जकात मधून समाजातल्या दीनदुबळ्यांना मदत केली जाते. यातून बंधुभावाची व एकतेची शिकवण मिळते ज्याची आज समस्त विश्वातील मानवजातीला गरज आहे़
(क्रमशः)
xqkbtsJmMPwCplX