सुमनताई ढाकणे प्रतिष्ठान व केदारेश्वर कारखाना कोरोना रुग्णांसाठी उभारणार 100 खाटांचे कोविड सेंटर
पाथर्डी । वीरभूमी- 19-Apr, 2021, 12:00 AM
शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत तसेच तालुका आरोग्य प्रशासनावर ताण पडत आहे. हा ताण कमी करणे व कोविड रुग्णांना स्थानिक पातळीवरच सर्व आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी कोविड सेंटर उभराण्यात येणार आहे.
कै. सुमनताई ढाकणे प्रतिष्ठान व संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बोधेगाव व पाथर्डी येथे 100 खाटांचे सुसज्ज कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार असल्याची घोषणा चेअरमन अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी केली.
अॅड. प्रताप ढाकणे म्हणाले, गेल्या काही दिवसापासून शेवगाव व पाथर्डी शहर व तालुक्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे दोन्ही तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे.
त्याचप्रमाणे दोन्ही तालुक्यातील स्थानिक प्रशासनही कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना युद्धपातळीवर राबवीत आहे. दोन्ही शहरे व तालुक्यातील ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या दररोज वाढत असून कोविड रुग्णांना आरोग्य सुविधा मिळवताना काही प्रमाणात धावाधाव करावी लागत आहे. दोन्ही तालुक्यातील आरोग्य विभाग रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यात आघाडीवर आहेच मात्र त्यांना अधिकचा आधार देण्याची गरज असल्याने आम्ही दोन्ही तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी सेवा केंद्र उभारत आहोत.
या कोविड केअर केंद्रात सदरच्या रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येतील त्यासाठी आरोग्य विभाग व संस्थेच्यावतीने आराखडा तयार करण्यात येत आहे. पाथर्डी येथील एकलव्य शिक्षण संस्थेच्या अध्यापक विद्यालयातील इमारतीत 50 खाटा व संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखाना कार्यस्थळावरील इमारतीमध्ये 50 खाटांचे कोविड केअर सेंटर असे दोन्ही ठिकाणी 100 खाटांचे कोविड रुग्णांसाठी कोविड सेंटर तात्काळ सुरू करण्यात येत आहे.
या केंद्रात कोरोना रुग्णांना सर्व आरोग्य सुविधांसह सर्व सोयी दिल्या जाणार आहेत. साखर कारखान्याच्या वतीने राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे कोविड केअर सेंटर उभारण्यात केदारेश्वर कारखान्याने पाऊल टाकले आहे.
सामाजिक जाणिवेतून दोन्ही तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी हे कोविड केअर सेंटर कार्यरत राहणार असून दुर्दैवाने पुढे गरज भासल्यास आणखी काही ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले जातील. परंतु अशी वेळ येऊ नये अशी प्रार्थना अॅड. प्रताप ढाकणे यांनी केली.
आधी कामगारास थकित पगार करा