चंदनाच्या झाडाची चोरी करताना तस्करांना शेतकर्यांनी रंगेहाथ पकडून केले पोलिसांच्या हवाली
श्रीगोंदा । वीरभूमी- 19-Apr, 2021, 12:00 AM
श्रीगोंदा शहराजवळील भोळेवस्ती रस्त्यावर सोमवार दि. 19 रोजी भरदुपारी बारा वाजता दोन चंदन चोरटे चंदनाचे झाड चोरी करण्याच्या उद्देशाने कापत असताना आसपासच्या शेतकर्यांनी रंगेहाथ पकडले.
शेतकर्यांनी चोरट्यांना चांगलाच प्रसाद देऊन पोलिसांच्या हवाली केले. आरोपींकडून एक लोखंडी पोगर व मोटारसायकल ताब्यात घेतली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी संतोष रामभाऊ कोथिंबीरे (वय 31) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, भोळेवस्ती रस्त्यावरील गट नं. 1,735 येथील आमच्या चुलत भावाच्या शेताच्या बांधावरील दोन चंदनाची झाडे भरदिवसा दुपारी बारा वाजेच्या सुमारास आरोपी भीमा हनुमंत भोसले (वय वर्षे-35) व सुनिल हनुमंत भोसले (वय वर्षे-26) (दोघे रा. शिरूर, जि. पुणे) हे चोरीच्या उद्देशाने झाडे कापत असताना मिळून आले.
या चोरांना पकडून पोलिसांना खबर दिली. तात्काळ पोलीस हवालदार बी. एल. खारतोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन या आरोपींना पकडून आणले. त्यांच्याकडून झाड कापण्याची लोखंडी पोगर व 20 हजार रुपयांची मोटारसायकल जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामराम ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बी. एल. खारतोडे करत आहेत.
हे चोरटे चंदनाची दिवसाच चोरी करताना सापडल्यावर आसपासच्या शेतकर्यांनी या चंदन चोरट्यांना खरपूस रट्टे द्यायला सुरुवात केली.
मार खाताना यातील एक चोरटा विनवणी करून म्हणाला की, आम्हाला मार द्या! पण हाताला सॅनिटायझर लावून काय मारायची ते मारा! चोरट्यांच्या विनंतीला मान देऊन शेतकर्यांनीही हाताला सॅनिटायझर लावून चोरांना चांगलेच बदडले व पोलिसांच्या हवाली केले.
Comments