वेल्डिंगसाठी ऑक्सिजनचा वापर; प्रशासनाकडून 27 टाक्या जप्त
कर्जत । वीरभूमी- 21-Apr, 2021, 12:00 AM
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. मात्र कर्जत शहरासह राशिन, मिरजगाव येथील वेल्डिंगच्या दुकानामध्ये ऑक्सिजन वापरत असल्याच्या खबरीवरून प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस, महसूल आणि नगरपंचायतीच्या संयुक्त पथकाने छापा टाकून ऑक्सिजनचे 27 सिलेंडर ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेले सिलिंडर जामखेड आणि कर्जतच्या रुग्णालयाला सुपूर्द केले. या धडक कारवाईचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
कोरोनाबाधित रुग्णांना संभाव्य ऑक्सिजनची गरज पाहता औद्योगिक क्षेत्रात खासकरून वेल्डिंगच्या दुकानात वापरात असलेल्या ऑक्सिजनची सिलिंडर ताब्यात घेण्याची मोहीम कर्जतच्या प्रशासनाने मंगळवारी हाती घेतली होती.
प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी तीन पथके नियुक्त करण्यात आली होती. कर्जत शहरासाठी मुख्याधिकारी गोविंद जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने यासह पोलीस कर्मचारी, तर राशीनसाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गटविकास अधिकारी अमोल जाधव व पोलीस कर्मचारी यासह मिरजगाव या ठिकाणी स्वतः प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे आणि पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे यांनी धडक कारवाई केली.
या कारवाईमध्ये पथकांनी तब्बल 57 ऑक्सिजनचे सिलिंडर हस्तगत केले. यामध्ये 27 ऑक्सिजनचे सिलिंडर भरलेले आढळले. ही हस्तगत केलेली भरलेली सिलिंडर जामखेड येथील रुग्णालयासाठी 15 तर 12 सिलिंडर कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आली.
अहमदनगर आरोग्य प्रशासनाकडून ऑक्सिजन उपलब्ध होईपर्यंत ही सिलिंडर वापरली जातील, अशी माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली. प्रथमच योग्य समन्वय राखत या अधिकार्यांनी ही धडक मोहीम यशस्वी केल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
मंगळवार दि. 20 रोजी कर्जतचे कर्तव्यदक्ष तहसीलदार नानासाहेब आगळे यांचा वाढदिवस होता. आगळे सकाळी 10 वाजल्यापासून आपल्या कार्यालयीन कामकाजात व्यस्त होते. संध्याकाळी 5 ला जिल्हाधिकारी अहमदनगर यांची व्हिडीओ कॉन्सफरन्स होती ती उशिरापर्यंत चालली. त्यानंतर प्रांताधिकारी यांनी तात्काळ पथक तयार करीत ऑक्सिजन सिलिंडर धडक मोहीम हाती घेतली.
सदरची मोहीम रात्री 11 ला संपल्यानंतर आगळे घरी रवाना झाले. आपल्या कुटुंबासोबत त्यांनी आपल्या वाढदिवसाचा केक रात्री साडे अकराला कापत वाढदिवस साजरा केला.
Comments