असा काढा अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जातांना लागणारा ई-पास
अहमदनगर । वीरभूमी- 23-Apr, 2021, 12:00 AM
राज्यासह जिल्ह्यात 23 एप्रिल पासून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील अत्यावश्यक कामानिमित्त बाहेर जातांना आता ई-पासची गरज पडणार आहे.
मात्र ई-पास कशा पद्धतीने काढायचा याबाबत अहमदनगर जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये माहिती दिली आहे.
या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, लॉकडाऊन कालावधीत ई-पास असणे आवश्यक आहे. या शिवाय अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडू नका. जिल्हा पोलिस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, ज्या नागरिकांना अत्यंत महत्वाचे (वैद्यकिय कारण, अत्यावश्यक सेवा, अंत्यविधी इ.) कामानिमित्त घराचे बाहेर जाणे गरजेचे आहे. अशा व्यक्तींनी ई-पास काढावा.
हा ई-पास काढण्यासाठी https://covid19.mhpolice.in या वेबसाईटवर जावून सदर वेबसाईटवर आपला स्वतःचा फोटो अपलोड करून आपली माहिती भरून ज्या कामानिमित्त घराचे बाहेर पडणार आहे त्या कारणाशी संबधित असलेले कागदपत्रे व आपले स्वतःचे ओळखपत्र जोडावे.
यानंतर आपली विनंती पूर्ण झाल्यानंतर सबमीट वर क्लीक करावे. यानंतर येणारा सांकेतीक क्रमांक जतन करून ठेवावा. तसेच सदर वेबसाईटवर जावून आपला सांकेतीक क्रमांक टाकून आपला ई-पास डाऊनलोड करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
घराच्या बाहेर पडतांना ई-पास नसल्यास कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा. अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडत असाल तर आपला ई-पास जवळ बाळगावा.
coniMNpfryCY