आदिवासी उपयोजनेतून अकोले तालुक्यात ऑक्सिजन प्लान्ट उभा राहणार
आमदार डॉ. किरण लहामटे यांची पत्रकार परिषदेत माहिती
अकोले । वीरभूमी- 01-May, 2021, 12:00 AM
अकोले तालुक्यातील कोरोनाच्या दुसर्या लाटेला आपण तोंड देत आहोत. तालुक्यात 650 ते 700 कोरोना रुग्ण अॅक्टिव आहेत. त्यापैकी जवळपास 450 रुग्ण अकोले तालुक्यातील समशेरपूर, राजूर, अकोले व इतर ठिकाणी य कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. तर बाकी रुग्ण संगमनेर येथे उपचार घेत आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात बेडस शिल्लक आहेत. कोरोना रुग्णांची परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही.तिसर्या लाटेची शक्यता विचारात घेऊन लवकरच आदिवासी उपयोजनेतून एक महिन्याच्या आत 1 कोटी 20 लाख रुपयांचा ऑक्सिजन जनरेटर प्लांट चालू होणार व पुढील दोन महिन्यात रिफिलिंगचा प्लान्ट सुरू होणार असल्याची माहिती आ. डॉ. किरण लहामटे यांनी दिली.
अकोले येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भानुदास तिकांडे, सुरेशराव खांडगे, सुरेश गडाख, अमित नाईकवाडी, चंद्रभान नवले, संतोष नाईकवाडी, संदीप शेणकर, अक्षय आभाळे, सुरज वाडगे, हरिदास माने आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. लहामटे पुढे म्हणाले की, शिक्षकांच्या योगदानातून इतर संस्थांच्या सहकार्यातून सुगाव खुर्द येथे 60 ऑक्सिजन बेडसचे कोविड सेंटर येत्या दोन तीन दिवसात सुरू होणार आहे. त्यासाठी लागणार्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत पालकमंत्री यांचेशी चर्चा करून सिन्नर एमआयडीसी, अहमदनगर व संगमनेर येथून ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा होणार असल्याचे सांगितले.
तालुक्यातील कोरोनाबाबत सोशल मीडियावर नागरिकांत व रुग्णात भीती निर्माण होईल असे मेसेज, व्हिडीओ टाकू नये. एकमेकांना धीर द्या. सरकारी कोविड सेंटरवर विश्वास ठेवावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे व भाजपचे कार्यकर्ते चांगले काम करीत आहेत.काही अडचण, तक्रार असेल तर प्रशासनाला सांगावे. गैरसमज पसरवून नागरिकांत भीती निर्माण होईल, असे काम करू नका. लॉकडाऊन नंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही, नागरिक सकाळी 7 ते 11 यावेळेत गर्दी करीत आहेत. कामाची आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, विनाकारण बाहेर पडू नका. वृद्ध व्यक्तींनी घराबाहेर पडू नये. नागरिकांनी अंगावर आजार काढू नये, काही त्रास जाणवत असेल तर तातडीने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे.
शिक्षक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका सर्व्हे करीत आहे.त्यांना सहकार्य करा. ग्राम सुरक्षा समितीने टेस्ट झालेल्या व्यक्तीला कोरोनटाईन करा. लसीचा पहिला डोस जवळपास 12 हजार नागरिकांनी घेतला. मात्र दुसरा डोस दोन हजार नागरिकांनी घेतल्याचे लक्षात येत आहे. लसीचा पहिला डोस घेतला असेल तर दुसरा डोस वेळेत घ्यावा.नाहीतर पहिल्या डोसचा उपयोग होणार नाही. सर्वानी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आ. लहामटे यांनी केले.
यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे यांनी जनतेला आवाहन करतांना म्हणाले की, सर्दी, खोकला, अंगदुखी, चव नसणे यासाठी आजारी माणूस खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घेत आहे. नंतर चार पाच दिवसांनी दुसर्या दवाखान्यात जाऊन उपचार घेत आहे. यामुळे आजार वाढत आहे. वेळच्या वेळी टेस्ट करून दवाखान्यात अॅडमिट व्हावे.खाजगी दवाखान्याने अशा माणसांची माहिती द्यावी. टेस्ट झालेल्या माणसांची नावे ग्रामपंचायतला कळविले जात असून त्यांनी अशा व्यक्तीला विलीगीकरण कक्षात ठेवावे.
दोन चाकी वाहनावर अत्यावश्यक कामासाठी आता फक्त एकानेच प्रवास करावा, दोघाने फिरू नये अन्यथा त्यांचेवर कारवाई केली जाणार आहे. मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नये. शनिवार व रविवार पूर्ण लॉकडाऊन असून इतर दिवशी सकाळी 7 ते 11 यावेळेत अत्यावश्यक सेवा चालू राहतील, सध्या 144 कलम लागू केलेले आहे. वृद्ध व्यक्तींनी घराबाहेर पडू नये. पॉझिटिव्ह रुग्णांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची नावे सांगावीत, म्हणजे इतरांना त्याचा त्रास होणार नाही, असे आवाहन तहसीलदार कांबळे यांनी केले.
qsIgVfvimQZ