कोरोना रोखण्यासाठी पाथर्डी तालुका प्रशासन अलर्ट
नियम मोडणार्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय
पाथर्डी । वीरभूमी- 01-May, 2021, 12:00 AM
आगामी काळात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने विविध उपाय योजनांची एकत्रित अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. गल्ली बोळांसह प्रमुख चौकांची नाका-बंदी, नियम मोडणार्या विरुद्ध गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी दिली.तहसील कार्यालयात महसूल, पालिका, पोलीस, आरोग्य व पंचायत समिती आदी विभागांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत भाजप युवा मोर्चाचे मुकुंद गर्जे, सुनील बेळगे, सोनल जोजारे, अभिजीत इथापे आदी कार्यकर्त्यांनी चर्चेत भाग घेऊन शहरातील प्रशासकीय कामातील गलथानपणाकडे लक्ष वेधले.
शहरात काही औषध विक्रेते डॉक्टरांच्या शिफारशी शिवाय कोरोनासारख्या आजारांवर औषधे देऊन अप्रत्यक्षपणे रोगाच्या फैलावाला खतपाणी घालत आहेत. बहुतेक दुकानात पुढे ग्राहकांची गर्दी असून अपवादाने डॉक्टरांच्या चिठ्ठ्या रुग्णांकडे असतात. ही बाब गंभीर असून अन्न व औषध प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.
सॅनिटायझर व वाफेचे यंत्राची मागणी वाढली असून काही विक्रेते मनमानी पद्धतीने दर आकारतात. शहरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सर्रास चढ्या दराने सुरू आहे. बर्याच दुकानांचे मागील दार उघडे असून उपनगरांमध्ये सर्व व्यवहार सुरळीत सुरू असतात प्रशासनाचे तिकडे लक्ष नाही.काही ठिकाणी ऑक्सिमीटर, टेंपरेचर गन सुद्धा अप्रमाणित कंपन्यांच्या मनमानेल त्या भावात विकले जात आहेत.
लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी असते. भाजीविक्रेते ठिकठिकाणी बसून भाजी विकतात. अवैध पेट्रोल विक्री सर्रास टपर्या वरून चालते. सकाळी आठवडे बाजार भरल्यासारखे वातावरण राहुन रस्त्याच्या कडेला वाहन पार्किंग करून काही जण अन्यत्र फिरत राहतात. दारूची मुबलकता अन् औषधी म्हणून समजले जाणारे रसवंतीगृह बंद आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात उसाचा रस रुग्णांसाठी सलाईन सारखे काम करतो याबाबत निर्णय घेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.
यावेळी बोलताना प्रांताधिकारी केकाण म्हणाले, शहरातील गर्दी नियंत्रणासाठी माजी सैनिकांची मदत घ्यावी. पोलीस मित्र सारखे संघटना कार्यरत करावे. पालिका प्रशासन नकारात्मक व बचावात्मक पद्धतीने काम करते ती पद्धत बदलुन लॉकडाऊनचा फायदा उठवुन टपर्या काढा, अतिक्रमणे हटवा. चौकाचौकात पथके नेमून उपनगरांमध्ये फिरती पथके तैनात करून पालिकेने नियम मोडणार्या विरुद्ध दहा हजार रुपये दंडाची कारवाई करावी.
अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष वेधून नियम मोडणार्या विक्रेत्या विरुद्ध गुन्हे दाखल करून दुकानांना किमान 15 दिवसांसाठी सिल ठोकावे. आगामी आठ दिवस शहरासह तालुक्यात कडकडीत बंद करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न नागरिकांनी यशस्वी करून घराबाहेर पडू नये. प्रशासन शांततेने घेते याचा अर्थ काही करू शकत नाही असा अर्थ लोकांनी लावू नये. लवकरच शहरात प्रभाग निहाय लसीकरण सुरू होणार आहे असे केकान यांनी सांगितले.
तहसीलदार श्याम वाडकर, नायब तहसीलदार पंकज नेवसे, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, कर निरीक्षक सोमनाथ गर्जे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, गुप्तवार्ता विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप, पंचायत समिती प्रशासनाचे प्रतिनिधी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी बैठकीसाठी उपस्थित होते.
पाथर्डी तालुक्यातील करंजी, चिचोंडी, तिसगाव, टाकळीमानुर, खरवंडी कासार, भालगाव, कोरडगाव, पागोरी पिंपळगाव, मणिकदौंडी, कासार पिंपळगाव अशा मोठ्या गावांमध्ये विशेष बंदोबस्त तैनात करुन शहरात येणार्यांची चौकशी करूनच प्रवेश दिला जाईल. बाहेर गावच्या लोकांनी शहरात गर्दी करू नये. यासाठी उपाययोजना करण्याची पालिकेने व्यवस्था करण्याची सूचना प्रांताधिकारी यांनी केली.
Comments