तुटवडा असणारे रेमडीसीवर उपलब्ध करीत नातेवाईकाची अडचण केली दूर
कर्जत 02-May, 2021, 12:00 AM
कर्जत | वीरभूमी दि २
राज्यात आणि जिल्ह्यात रेमडीसीवरचा मोठा तुटवडा असताना जेथे गरजवंत रुग्ण या औषधासाठी हवे तितके पैसे मोजत असताना तेच इंजेक्शन फक्त एका साध्या कॉलवर उपलब्ध करीत त्या रुग्णाला जीवदान देण्याचे काम माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी केले आहे. बजरंगवाडी येथील एका कोरोनाबाधीत रुग्णाला रेमडीसीवरची आवश्यकता होती राम शिंदे यांना कॉल येताच त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे तात्काळ मागवीत त्यास सर्वत्र तुटवडा असणारे इंजेक्शन अवघ्या काही मिनिटातच उपलब्ध केल्याने त्या रुग्णासह नातेवाईकानी माजीमंत्री शिंदे यांना धन्यवाद दिले.
देशात, महाराष्ट्र राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात देखील मोठ्या संख्येने कोरोनाबाधीत रुग्ण दिवसा-दिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येने सर्वच प्रमुख ठिकाणी हॉस्पिटल तुडुंब झाल्याने कोणाला बेड न मिळाल्याने तर कोणाला ऑक्सिजन तर अनेकांना योग्य उपचाराअभावी आपले जीव गमवावे लागले आहे. कर्जत तालुक्यात सध्या कोरोनाचे मोठे थैमान सुरू आहे. दररोज तीन आकडी कोरोनाबाधीत रुग्ण आढळत आहे. बजरंगवाडी-कोरेगाव येथील एका शेतकऱ्याला अशीच कोरोनाबाधा झाली. सदर रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याचा जीव वाचविण्यासाठी त्यास रेमडीसीवरची गरज असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यानी सांगितले. यावेळी त्या पेशंटचे नातेवाईक ग्रामीण भागातील असल्याने त्यांना मोठे अडचणीला आणि संकटाला सामोरे जावे लागले. यावेळी त्यांच्या लगतच्या नातेवाईकाने कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती बापू शेळके आणि कर्जत तालुका भाजपाचे कोषाध्यक्ष सोनू भिसे यांना कॉल करत रेमडीसीवर उपलब्ध होईल का ? अशी विचारणा केली. शेळके आणि भिसे यांनी तात्काळ त्या नातेवाईकास धीर देत माजीमंत्री प्रा राम शिंदे यांना गंभीर परिस्थितीची माहिती दिली. राम शिंदे यांनी तात्काळ महत्वाचे कागदपत्रे जमा करावे असे सांगत अवघ्या साध्या एका कॉलवर त्या कोरोनाबाधीत रुग्णासाठी रेमडीसीवर उपलब्ध करून देत दिलासा दिला. रविवारी स्वता त्या रुग्णाने आणि त्याच्या नातेवाईकांनी तब्येत सुधारत असून राम शिंदे यांनी केलेली मदत आयुष्यात विसरणार नाही. जर वेळेत रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध झाले नसते तर ती कल्पना करने शक्य नव्हती असे म्हणत राम शिंदे यांना धन्यवाद देत आभार मानले.
Comments